जत तालुक्यात विजेच्या मागणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:24+5:302021-04-01T04:27:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे, परंतु ...

जत तालुक्यात विजेच्या मागणीत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे, परंतु कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे विद्युत मोटारी व विद्युत जनित्र जळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
२०१२ पासून मागील दहा वर्षांत शेतीपंपासाठी नवीन कनेक्शन देण्याची प्रक्रिया बंद आहे. तालुक्यात विंधन विहिरी, विहिरी, शेत तलावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पैसे भरूनही वेळेत वीजकनेक्शन मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हुक टाकून कनेक्शन घेतले आहे. त्यामुळे डीपीवर लोड पडून कमी दाबाने वीजपुरवठा होताे. त्यामुळे विद्युत मोटारी जळण्याचे आणि डीपी नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्याकडून बेकायदेशीर कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्यांचे हुक काढून घेणे, फ्युज किंवा पेटी काढून घेणे असे प्रकार वेळोवेळी केले जातात, पण काही अधिकारी व कर्मचारी आर्थिक स्वार्थ साधून अशा शेतकऱ्यांना पाठीशी घालत आहेत. परिणामी, महावितरणचे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित वीजबिल भरून वीज कनेक्शन घेतले आहे, त्यांना विद्युत मोटारी व जनित्र जळाल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.
महावितरणने अनधिकृत कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्याचे कनेक्शन अधिकृत करून व डीपीची संख्या वाढविल्यास, कंपनीच्या उत्पन्नात भर पडून सर्वच शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीज मिळू शकते. यासाठी विशेष मोहीम सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
डीपी (विद्युत जनित्र) नादुरुस्त झाला, तर अधिकृत कनेक्शन असलेल्या शेतकऱ्याकडून वर्गणी काढून त्याची दुरुस्ती केली जात आहे. डीपी दुरुस्तीची साेय जत येथे झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय कमी होणार आहे. त्यामुळे कवठेमहांकाळऐवजी जत येथे डीपी दुरुस्ती स्टेशन सुरू करावे, अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे.