मिरज तालुक्यातील मतदारसंघांत वाढ
By Admin | Updated: September 11, 2016 00:26 IST2016-09-10T23:56:06+5:302016-09-11T00:26:29+5:30
प्रारूप रचना : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका

मिरज तालुक्यातील मतदारसंघांत वाढ
मिरज : जि. प. गट व पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेत मिरज तालुक्यात एक जि. प. व दोन पंचायत समिती मतदार संघात वाढ झाल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. म्हैसाळ जि. प. गट स्वतंत्र अस्तित्वात असल्याने शिंदे घराण्यात चुरशीने लढत होण्याची चिन्हे आहेत. या स्वतंत्र मतदार संघाने बेडग येथील इच्छुकांना जि. प.मध्ये जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पंचायत समितीच्या नव्या रचनेतील वाढीव दोन मतदार संघांमुळे व अनेक गावात झालेल्या बदलामुळे विद्यमान पंचायत समिती सदस्यांना निवडणुकीसाठी नव्याने बांधणी करावी लागणार आहे. पुनर्रचनेत जि. प.चे गट ११ व पंचायत समितीचे २२ गण निर्माण झाले आहेत.
तालुक्यातील पूर्वीच्या जि. प.च्या बेडग गटातून म्हैसाळ हा स्वतंत्र गट उदयास आला आहे. बेडगचा जि. प. गटात समावेश असल्याने म्हैसाळचे वर्चस्व राहिले. केदारराव शिंदे व त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अलकादेवी शिंदे निवडून आल्या. म्हैसाळकर शिंदे घराण्याच्या वर्चस्वामुळे बेडगेतील इच्छुकांना संधी मिळाली नव्हती. पुनर्रचनेत बेडग व म्हैसाळ स्वतंत्र गट अस्तित्वात आल्याने मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांची केदारराव शिंदे गटाशी लढत होणार आहे. बेडग जि. प. मतदारसंघ स्वतंत्र राहिल्याने तेथील इच्छुकांना संधी मिळणार आहे. कठवेपिरान जि. प. गटावर विद्यमान सदस्य भीमराव माने यांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वामुळे पूर्वी समाविष्ट असलेल्या समडोळीतील इच्छुकांना निवडणूक लढविण्यासाठी वाव मिळाला आहे. समडोळी गट स्वतंत्र झाल्याने तेथील इच्छुकांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. समडोळी जि. प. गटात हरिपूरचा समावेश असल्याने पंचायत समिती सदस्य अशोक मोहिते यांच्या भूमिकेवरही येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुनर्रचनेत दोन गण वाढल्याने पंचायत समितीतील सदस्यसंख्या २० वरून २२ झाली आहे. लोकसंख्येवर आधारित गणांची नावे बदलली असली तरी, तांत्रिकदृष्ट्या कवठेपिरान, इनामधामणी व नरवाड गणांची नव्याने निर्मिती झाली आहे. अनेक गावांची अदलाबदल झाल्याने पुनर्रचनेत समीकरणे बदलणार आहेत. इच्छुकांना ब्रेक लागला आहे. आरक्षण जाहीर होणार असल्याने आरक्षणात कोणाचा मतदारसंघ शाबूत राहणार, कोणाची दांडी उडणार हे स्पष्ट होणार आहे. आरक्षण सोडतीवरही समीकरणे अवलंबून असल्याने इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
जिल्हा परिषद गट व पं. स. गण
मालगाव -मालगाव, मल्लेवाडी, कवलापूर - बामणोली, कवलापूर,
बुधगाव - माधवनगर, बुधगाव, क. डिग्रज- नांद्रे, कसबे डिग्रज,
कवठेपिरान- दुुधगाव, कवठेपिरान, समडोळी -समडोळी, इनामधामणी,
म्हैसाळ - म्हैसाळ, टाकळी, बेडग- बेडग, नरवाड, भोसे - भोसे, सोनी,
एरंडोली -एरंडोली , सलगरे, आरग -आरग , खटाव
पंचायत समिती गणात समाविष्ट गावे
खटाव : खटाव, लिंगनूर, शिपूर, संतोषवाडी, जानराववाडी, सलगरे : सलगरे, बेळंकी, चा.वाडी, पा.वाडी, कदमवाडी, डोंगरवाडी, एरंडोली : एरंडोली, खंडेराजुरी, गुंडेवाडी, व्यंकोचीवाडी, भोसे : भोसे, तानंग, कळंबी, सिध्देवाडी, सोनी : सोनी, करोली एम., कांचनपूर, पाटगाव, कानडवाडी, रसूलवाडी, सांबरवाडी, काकडवाडी, मानमोडी, टाकळी : टाकळी, बोलवाड, वड्डी, नरवाड : नरवाड, विजयनगर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, बेडगचा काही भाग, बेडग : बेडग, म्हैसाळ : म्हैसाळ, मालगाव : मालगाव, कवलापूर : कवलापूर, बामणोली, कसबे डिग्रज : नांद्रे, क. डिग्रज, कवठेपिरान : कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, शेरीकवठे, समडोळी : समडोळी, हरिपूर, मल्लेवाडी : मालगाव, मल्लेवाडी, कवलापूर : कवलापूर, बिसूर, बुधगाव : बुधगाव, खोतवाडी, वाजेगाव, नांद्रे : नांद्रे, मौजे डिग्रज, इनामधामणी : इनामधामणी, अंकली, बामणी, निलजी, ढवळी, दुधगाव : दुधगाव, तुंग, आरग : आरग, माधवनगर : माधवनगर, कर्नाळ.