साखरेची आधारभूत किंमत क्विंटलला पाचशेने वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:06+5:302021-08-27T04:29:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : केंद्र सरकारने जशी उसाची अधारभूत किंमत वाढवली आहे, तशी साखरेचीही क्विंटलला ५०० रुपयांनी वाढवावी, ...

साखरेची आधारभूत किंमत क्विंटलला पाचशेने वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : केंद्र सरकारने जशी उसाची अधारभूत किंमत वाढवली आहे, तशी साखरेचीही क्विंटलला ५०० रुपयांनी वाढवावी, अशी मागणी विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. दिवाळीपूर्वी उर्वरित प्रतिटन २२५ रुपयांचे अंतिम बिल देऊन ऊस उत्पादकांचा सण गोड करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चिखली (ता. शिराळा) येथे विश्वास कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर, सौ. सुनीतादेवी नाईक व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांची प्रमुख उपस्थित होती.
आमदार नाईक म्हणाले, उसाची आधारभूत किंमत, तोडणी, वाहतूक, उत्पादन, बँकांकडील कर्जावरील व्याज आदी खर्च आणि बाजारात साखरेला मिळणारा दर याचा मेळच बसत नाही. महापुराच्या संकटामुळे साखर उद्योगाला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने साखरेची किंमत क्विंटलला ५०० रुपयांनी वाढवावी.
ते म्हणाले की, गेल्या हंगामात ५ लाख ८० हजार टन गाळप, तर ६ लाख ६२ हजार ६१० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले. हमीभावाप्रमाणे पहिली उचल २५००, दुसरा हप्ता २५० रुपयेप्रमाणे दिला आहे. आता राहिलेली रक्कम २२५ रुपये प्रतिटनाप्रमाणे दिवाळीत एकरकमी देणार आहोत.
मुख्य अभियंता दीपक पाटील यांनी स्वागत केले. व संचालक बाळासाहेब पाटील व त्यांच्या पत्नी सौ. निर्मला यांच्याहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले.
यावेळी ‘प्रचिती’चे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, विवेक नाईक, दिनकरराव पाटील, शिवाजीराव घोडे-पाटील, विजयराव नलवडे, भीमराव गायकवाड, विश्वास कदम, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, मानसिंग पाटील आदी उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.