बुधगावात शौचालयांअभावी महिलांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:32 IST2021-04-30T04:32:51+5:302021-04-30T04:32:51+5:30

बुधगावातील वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये शिवाजीनगर परिसरात उत्तरेला वसंत काॅलनीच्या बाजूला पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी पाच शौचालयांची दोन युनिट ...

Inconvenience to women due to lack of toilets in Budhgaon | बुधगावात शौचालयांअभावी महिलांची गैरसोय

बुधगावात शौचालयांअभावी महिलांची गैरसोय

बुधगावातील वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये शिवाजीनगर परिसरात उत्तरेला वसंत काॅलनीच्या बाजूला पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी पाच शौचालयांची दोन युनिट ग्रामपंचायतीने बांधली होती. त्यापैकी महिलांसाठीच्या शौचालयाच्या युनिटमधील चार शौचालये ग्रामपंचायतीने वर्षापूर्वी नवीन बांधण्याच्या उद्देशाने पाडली आहेत. सुमारे दीडशे कुटुंबातील महिलांकडून या शाैचालयांचा वापर होत होता.

उर्वरित एका शौचालयाचाच सध्या वापर सुरू आहे. या शौचालयाला वेली-झुडुपांनी वेढले आहे. वर छतही नसल्याने, ऊन-पावसाचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. त्यातच शौचालयाच्या दरवाजावर आतील बाजूस मधमाशांचे मोहोळ लागले आहे. त्यामुळे जीव मुठीत धरूनच या शौचालयांचा वापर करण्याची वेळ महिलांवर आली आहे.

पुरुष शौचालय युनिटची अवस्था तुलनेने बरी असली तरी, स्वच्छतेअभावी पाचपैकी एक शौचालय तुंबल्याने चारच शौचालये सुरू आहेत.

या प्रश्नी येथील महिलांनी मोर्चाद्वारे ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. ३१ मेपूर्वी महिलांसाठीचे हे शौचालय युनिट ग्रामपंचायतीने न बांधल्यास सरपंच व सदस्यांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Inconvenience to women due to lack of toilets in Budhgaon