खानापूर तालुक्यात अवकाळीने हानी
By Admin | Updated: March 12, 2015 00:07 IST2015-03-11T23:37:34+5:302015-03-12T00:07:34+5:30
वादळी वाऱ्यासह पाऊस : आळसंद परिसरात २१ हेक्टर द्राक्षाचे, २४ हेक्टर डाळिंबाचे नुकसान

खानापूर तालुक्यात अवकाळीने हानी
विटा/आळसंद : विटा शहरासह खानापूर तालुक्यात मंगळवारी रात्री पुन्हा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यावेळी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्याने द्राक्षे, डाळिंब, आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. सरासरी २५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, आळसंद परिसरात द्राक्षाचे सुमारे २१ हेक्टर, तर डाळिंब पिकाचे २४ हेक्टर नुकसान झाले. वादळी वाऱ्याने आळसंद येथील रामचंद्र मरिबा जाधव व कमळापूरचे संतोष गोतपागर यांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले.
मंगळवारी रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. आळसंद, कमळापूर, भाळवणी, कार्वे, मंगरूळ, बामणी, खानापूर, रेणावी, रेवणगाव, लेंगरे, माहुली परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने द्राक्षे, शाळू व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. विटा मंडल विभागात २१ मि.मी., भाळवणी- १९, खानापूर- ४२, लेंगरे- २१ व करंजे मंडल विभागात १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
दरम्यान, आळसंद येथे मंगळवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने रामचंद्र जाधव यांच्या घराची भिंत कोसळली. कमळापूर येथील संतोष जालिंदर गोतपागर यांच्या घराचे पत्रे उडून गेले. आळसंद येथील सीताराम गणू हारूगडे यांचे २ एकर द्राक्षे, ५ एकर डाळिंब आणि २ एकर आंबा पिकाचे नुकसान झाले. जानू मारूती हारूगडे यांचे दोन एकर द्राक्षे व एक एकर डाळिंब, नामदेव रघुनाथ जाधव यांचे साडेसहा एकर डाळिंबाचे, अनिल मधुकर जाधव यांचे एक एकर द्राक्षाचे, हिंमतराव जाधव यांच्या नऊ एकर डाळिंबाचे, किरण सोपान कचरे यांच्या दोन एकर डाळिंबाचे, तानाजी सुर्वे यांच्या दोन एकर डाळिंबाचे, राधेशाम पोपट जाधव यांच्या पाच एकर डाळिंबाचे, वाझर येथील संग्राम जाधव यांच्या पाच एकर द्राक्षाचे, संजय रामचंद्र माने यांच्या चार एकर द्राक्षाचे, मनीषा रामचंद्र माने यांच्या चार एकर द्राक्षाचे, तसेच किसन सदाशिव जाधव यांच्या २० गुंठे गहू पिकाचे वादळी वारे व अवकाळी पावसाने नुकसान झाले. (वार्ताहर)