आष्टा येथे आज ‘जयंत अॅग्रो’ प्रदर्शनाचे उद्घाटन
By Admin | Updated: February 15, 2015 23:47 IST2015-02-15T23:23:53+5:302015-02-15T23:47:54+5:30
दिलीप वळसे-पाटील यांची उपस्थिती : बुधवारपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन

आष्टा येथे आज ‘जयंत अॅग्रो’ प्रदर्शनाचे उद्घाटन
आष्टा : माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित चौथ्या ‘जयंत अॅग्रो २0१५’ या राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशू-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ११ वाजता विधानसभेचे माजी सभापती आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्याहस्ते होत आहे़ आमदार जयंत पाटील, समारंभाचे अध्यक्ष व माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा सौ़ मंगलादेवी शिंदे, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे़ रविवारी सर्व जातींच्या वाड्यासह, अखंड मुळासह ऊस स्पर्धा, भाजीपाला पीक प्रदर्शन व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सोमवारी गाय, म्हैस, बैल प्रदर्शन, शेळी, मेंढी व पक्षी प्रदर्शन, तसेच पुष्प प्रदर्शन व स्पर्धा, केळी घड प्रदर्शन व स्पर्धा होणार आहेत़ रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ मंगळवारी गाय, म्हैस, बैल प्रदर्शन व स्पर्धा, शेळी, मेंढी, पक्षी प्रदर्शन स्पर्धा, नावीन्यपूर्ण कृषी औजारे निर्मिती स्पर्धा आणि हॉर्स शो होणार आहे़ बुधवारी डॉग शो, बक्षीस वितरण आणि प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. प्रदर्शनाच्या चारही दिवस धान्य महोत्सव होणार आहे.कॉलेजच्या प्रांगणात अडीच एकरात सुपर स्ट्रक्चर मंडप घातला आहे़ यामध्ये ८0 बाय १00 ची ३ सुपर स्ट्रक्चर उभी केली आहेत़ प्रवेशद्वारात ‘स्फूर्तिस्थळ’ ही नवी संकल्पना उभारली आहे़ यामध्ये राजारामबापूंनी स्थापन केलेल्या व आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी घोडदौड करणाऱ्या संस्था, पाणी पुरवठा संस्था आदींच्या माध्यमातून झालेली वाळवा तालुक्याची प्रगती अधोरेखीत केली आहे.
या प्रदर्शनात ‘अपारंपरिक ऊर्जा पार्क’ हे विशेष आकर्षण आहे. उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण समारंभासाठी स्वतंत्र मंडप उभारला आहे़ येथे २ हजार लोकांची बैठक व्यवस्था आहे. जनावरांच्या प्रदर्शनासाठीही स्वतंत्र मंडप उभारला आहे.
जयंत अॅग्रोचे अध्यक्ष रामरावतात्या देशमुख, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा़ शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, आनंदराव पाटील, कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष बी़ डी़ पवार, शिक्षण संस्थेचे सचिव आऱ डी़ सावंत, प्राचार्य डॉ़ विलास काळे, आष्ट्याचे संग्राम फडतरे, संदीप गिड्डे, डी़ आऱ पाटील, प्रेमचंद कमलाकर प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत़ या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासन व सांगली जिल्हा परिषदेचा कृषी आणि पशू विभागही सहभागी आहे. (वार्ताहर)