हुतात्मा बँकेच्या मोबाइल ॲपचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:06+5:302021-08-17T04:32:06+5:30
वाळवा : हुतात्मा बँक सभासदांची आहे. ठेवीदारांची संख्या लाखावर आहे. आपण फक्त विश्वस्त आहोत. बँकेच्या विश्वासाला तडा जाता कामा ...

हुतात्मा बँकेच्या मोबाइल ॲपचे उद्घाटन
वाळवा : हुतात्मा बँक सभासदांची आहे. ठेवीदारांची संख्या लाखावर आहे. आपण फक्त विश्वस्त आहोत. बँकेच्या विश्वासाला तडा जाता कामा नये, हुतात्म्यांच्या नावाने बँक सुरू झाली आहे. ज्याला इतिहास माहीत नाही तो वर्तमानात कमी पडतो, त्यामुळे भविष्य घडवू शकत नाही, असे प्रतिपादन हुतात्मा बँकेचे संस्थापक वैभव नायकवडी यांनी केले.
हुतात्मा बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मोबाइल बँकिंग ॲपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा समारंभ बँकेच्या सर्व कर्मचारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साखर कारखाना कामगार भवन येथे पार पडला. बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. चौगुले, संचालिका नंदिनी नायकवडी, बाजीराव मांगलेकर, अरुण यादव, दिलीप पाटील, रमेश आचरे, संदीप जाधव उपस्थित होते.
नायकवडी म्हणाले, मार्केटमध्ये आता व्यवसाय राखून ठेवला आहे हे विसरून जावे. व्यवसाय करायचा असेल तर ग्राहक शोधावा लागेल. बँकिंग व्यवसायात विविध कंपन्यांसुद्धा लायसेन्स घ्यायला लागल्या आहेत. सहकार टिकतोय का संपतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हुतात्मा बँकेच्या २५ वर्षांच्या इतिहासात एकानेसुद्धा माझे पैसे सुरक्षित आहेत की नाहीत याची चौकशी केली नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी हुतात्मा बँकेची मल्टिस्टेट बँक करण्यात येत आहे. लहान लहान बँकांचे अस्तित्व बंद करून सरकार त्यांना पतसंस्थांमध्ये परावर्तित करत आहे. बँकेने मोठ्याला मोठे करण्यापेक्षा लहान दहा जणांना मोठे करण्याचा प्रयत्न केला आहे.
नंदिनी नायकवडी म्हणाल्या, संस्था असेल तर कर्मचारी आणि कर्मचारी असेल तर संस्था असते. कर्मचाऱ्यांच्या कामावरून संस्था नावारूपाला येत असतात. कोरोना व महापूर यामुळे बँकिंग काटेकोरपणे करावे लागत आहे. कर्मचारी जी वागणूक ग्राहकांना देणार तीच प्रतिमा बँकेची उभी राहाणार आहे हे विसरून चालणार नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. रमेश आचरे यांनी आभार मानले.