सांगली : पारंपरिक लोककलांद्वारे लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमास सखी मंच सदस्यांनी भरभरून दाद दिली. ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. जिव्हाळा निर्मित, संपत कदम प्रस्तुत ‘भूपाळी ते भैरवी’ कार्यक्रमाचा हा १२३ वा प्रयोग होता. भल्या पहाटेची भूपाळी, जात्यावर दळण दळताना गायिली जाणारी ओवी, भल्या पहाटे व्हणारं सांगत येणारा ‘पिंगळा’ जोशी, अठरा पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी, लोकसंस्कृतीचा उपासक वासुदेव, खदखदून हसवणारा बहुरूपी, पोतराज, कडकलक्ष्मीवाला, नटखट गवळण, विनोदातून अध्यात्म सांगणारं भारूड, लोकनाट्यातील बतावणी, लावणी, मोटेवरचं गीत, नंदीबैल, कोळीनृत्य, आदिवासी नृत्य, धनगरी ओव्या, एकात्मतेची नाळ जोडणारी भैरवी आदींचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमात कृष्णात पाटोळे, मिलिंद कांबळे, सिकंदर पिरजादे, नरेंद्र हराळे, बाळासाहेब गणे, महेश नवाळे, अभिजित कदम, अवधुत माने, संजय घोलप, अविनाश कोठावळे, हेमंत थोरात, जयश्री जाधव, वैष्णवी जाधव, रोहिणी जाधव, वर्षा जाधव, अबोली कदम, कृणाल मसाले यांचा समावेश होता. यावेळी सखी मंच कमिटीच्या सदस्या जयश्री कुरणे व संगीता हारगे उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
‘भूपाळी ते भैरवी’ला उत्स्फूर्त दाद
By admin | Updated: February 2, 2015 00:16 IST