आझाद चौक ते झरी नाका या मुख्य बसस्थानक रस्त्याची झालेली दुरवस्था.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेल्या तीस वर्षांत तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने शहरातील नागरिकांना विकासाची स्वप्ने दाखविली. मात्र बहुतांशी स्वप्ने अर्ध्यावरच आहेत. सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासाच्या घोषणेचे गाजर दाखविले आहे. चौकाचौकांतील मुख्य रस्त्यांची अवस्था पाहता नागरिकांना सुधारित रस्त्यांचे दिवास्वप्न ठरणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असलेली कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.
सत्ताधारी विकास आघाडीने शहरातील सुधारित रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असल्याचे सांगतात. रस्ते होण्याअगोदर भुयारी गटारीची कामे आजही अपूर्ण आहेत. त्यामुुळे रस्तेही केले नाहीत. जे रस्ते झाले आहेत, ते निकृष्ट झाले आहेत. चौकातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे बुजवून तात्पुरती डागडुजी नेहमी केली जाते. परंतु एकाच पावसात पुन्हा खड्डे निर्माण होतात. काही उपनगरातील रस्ते केले आहेत, मात्र तेही अर्धवट आहेत. प्रशासकीय इमारत ते शिराळा नाका या रस्त्याचे काम अर्ध्यावरच सोडण्यात आले आहे. याबाबत लोकप्रतिनिधींना विचारले असता पावसाळा सुरू झाल्याने काम बंद आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांना हाल सोसावे लागणार आहेत. या परिसरातील विशालनगर येथील नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही रस्ता झाला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून फक्त आश्वासने दिली जातात. या परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक संजय कोरे आणि विक्रम पाटील यांनी आपल्या प्रभागातील रस्ते चकाचक केले आहेत. आष्टा नाका ते पोस्ट ऑफिस, शिवाजी पुतळा ते जुन्या बहे नाक्यापर्यंत रस्त्याची अवस्था खडतर बनली आहे. चौकांतच मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या खड्ड्यांची अनेकवेळा डागडुजी केली तरी रस्त्याची अवस्था जैसे थे असते. आझाद चौक ते झरी नाका या मुख्य बसस्थानक रस्त्यावर गटारीचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी आपला विक्री होणारा माल गटारीवरच मांडला आहे. त्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरण तर सोडाच गटारी नेहमीच तुंबलेल्या असतात. काहींनी तर गटारीवरच अतिक्रमणे केली आहेत. परिणामी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. सावकर कॉलनीतील रस्ता झाला असला तरी बसस्थानक पाठीमागील रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था आहे. तत्कालीन राष्ट्रवादीने विकासाची दाखवलेली स्वप्ने तर धुळीस मिळाली आाहेत, तर सत्ताधारी विकास आघाडीने घोषणांचा पाऊस पाडून नागरिकांच्या स्वप्नातील रस्ते दाखविण्याचा नवीन पायंडा पाडला आहे.