सांगली अपर तहसीलचा कारभार सुधारा अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:39+5:302021-07-01T04:19:39+5:30
सांगली : सर्वसामान्य सांगलीकर नागरिक व आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सांगलीत अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे; मात्र आता ...

सांगली अपर तहसीलचा कारभार सुधारा अन्यथा आंदोलन
सांगली : सर्वसामान्य सांगलीकर नागरिक व आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सांगलीत अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे; मात्र आता अधिकाऱ्यांच्या सोयीने कारभार चालत आहे. गुंठेवारी, बिगरशेती, गौण खनिजविषयक कामे करताना अडचणी येत आहेत. कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे.
या आशयाचे निवेदन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मेलव्दारे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अपर तहसील कार्यालयात नागरिकांना अधिकाऱ्यांनी नेमलेल्या एजंटांचा त्रास सहन करावा लागत आहे. गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव सादर केले जातात, पण एजंटांचा त्यात हस्तक्षेप आहे. एजंटांमार्फत न गेल्यास कामे अडवली जातात. सातबारा संगणकीकरणाच्याही त्रुटी आहेत. याबाबत तक्रार केली तर सर्व्हर बंद आहे, तहसीलदार आले नाहीत, असे सांगितले जाते व पैसे दिल्यास लगेच कामे केली जातात. त्यामुळे या कार्यालयातील लाचखोरी न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
समितीचे सतीश साखळकर, माजी आ. नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, उमेश देशमुख, अमर पडळकर, अशरफ वांकर, महेश खराडे, डॉ. संजय पाटील, विकास मगदूम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर केले. निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहे.