तासगाव तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: August 3, 2015 00:13 IST2015-08-02T23:06:45+5:302015-08-03T00:13:31+5:30
मोहनराव कदम यांच्याकडून निषेध

तासगाव तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
तासगाव : भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रविवारी करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनास तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तासगावात कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शनिवारी तासगाव बाजार समितीच्या मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते जखमीही झाले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी रविवारी तासगाव बंदचा इशारा दिला होता. त्याला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. या बंदला तासगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रविवारी सकाळपासून सर्वच दुकाने उत्स्फूर्तपणे बंद होती. शनिवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण होते. तसेच मार्केट यार्डात रविवारी मतमोजणी होणार असल्यामुळे शहरात दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे शहरात तणावपूर्ण शांतता दिसून येत होती.
विसापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विसापूर, हातनोली, बोरगाव, गोटेवाडी येथे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध करण्यात आला.तासगाव बाजार समिती निवडणुकीच्या मतदानावेळी हा अनुचित प्रकार घडला असून, विरोधकांना पराभव समोर दिसल्यानेच त्यांनी भाडोत्री गुंडांकडून दहशत माजविण्याचा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, नेत्यांना मारहाण केल्याने, राष्ट्रवादी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.विसापूर गाव कडकडीत बंद ठेवून राष्ट्रवादी पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांकडून निषेध फेरी काढण्यात आली. तसेच हा भ्याड हल्ला करणाऱ्या विरोधक भाजपवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
सावळज : तासगावमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीवेळी भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या घुमश्चक्रीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुकारलेल्या सावळज ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तासगावनंतर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या सावळजमधील सर्व दुकाने बंद असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता.
कवठेएकंद : कवठेएकंद येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाव बंद ठेवून मारहाणीचा निषेध केला. येथे जुन्या चावडीपासून राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी निषेध रॅली काढून ‘बंद’चे आवाहन केले. कुमठे, नागाव कवठे येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. (वार्ताहर)
मोहनराव कदम यांच्याकडून निषेध
काँग्रेसचे नेते मोहनराव कदम यांनी रविवारी आमदार सुमनताई पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करून, आबा कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वायफळे येथील राष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव पाटील बाजार समिती निवडणुकीत विजयी झाल्यानंतर वायफळेमध्ये त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून व गुलाल उधळून जल्लोष केला.