सुधारित पाणी योजना कार्यान्वित; तरी मिरजेत पाण्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST2021-05-18T04:27:59+5:302021-05-18T04:27:59+5:30
मिरज शहरातील जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर वाढत्या लोकसंख्येचा ताण असल्याने शहरात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे अमृत योजनेसाठी सुमारे शंभर कोटी ...

सुधारित पाणी योजना कार्यान्वित; तरी मिरजेत पाण्याची टंचाई
मिरज शहरातील जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर वाढत्या लोकसंख्येचा ताण असल्याने शहरात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे अमृत योजनेसाठी सुमारे शंभर कोटी खर्च करण्यात आले आहेत. मात्र, अमृत योजना पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्यानंतरही पाण्याची समस्या कायम आहे. शहरातील अनेक रस्ते ड्रेनेज वाहिन्यांसाठी व अमृत योजनेच्या कामासाठी खुदाईमुळे अनेक ठिकाणी जुन्या जलवाहिन्या फुटल्या आहेत. यामुळे गळतीची समस्या कायम आहे. जलवाहिन्या नादुरुस्त असल्याने अनेक भागात जेथे पूर्वी दिवसातून दोनवेळा मुबलक पाणी नळाला येत होते तेथे आता अमृत योजनेचे कनेक्शन घेतल्यावर नळाला कमी दाबाने पाणी येत आहे.
शहरात ब्राह्मणपुरी परिसरात भानू तालीम परिसर, पाटील हौद परिसर, गजानन मंगल कार्यालय परिसर अशा ठिकाणी वॉटर एटीएम मशीनवरून विकत पाणी घेण्यासाठी रांगा लागत आहेत. जुनी पाणीपुरवठा यंत्रणा सुरू असताना अशी वेळ यापूर्वी आली नव्हती. शहरात पाणीटंचाई असल्याने मोटारी लावून पाणी खेचण्यात येत असल्याने पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे.
चौकट
गैरसोयीच्या तक्रारी
अमृत योजना कार्यान्वित होऊनसुद्धा पाणी मुबलक येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. कृष्णा नदीतून पाणी शुद्धिकरण केंद्रात आणून पाणी शुद्ध करून पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी कृष्णा घाट येथे केवळ पाणी उपशासाठी एक्सप्रेस फिडर बसवला आहे. एक्स्प्रेस फिडर वारंवार बंद पडत असल्याने पाणी उपशावर परिणाम होत आहे. अमृत योजनेचे पाणी सोडण्याच्या वेळाही गैरसोयीच्या आहेत. पाणी कमी दाबाने मिळते. पाणी सोडण्याच्या वेळा नागरिकांच्या गैरसोयीच्या असल्याच्या तक्रारी आहेत.