कल्पना दारिद्र्यामुळे समाजाचा नैतिक ऱ्हास
By Admin | Updated: August 5, 2014 23:21 IST2014-08-05T22:39:03+5:302014-08-05T23:21:18+5:30
कविता महाजन : पुरुषांनाच सबल करण्याची गरज

कल्पना दारिद्र्यामुळे समाजाचा नैतिक ऱ्हास
इस्लामपूर : बदलत्या समाजजीवनात महिलांनी बदलाचा वेग आत्मसात केला आहे. त्याबरोबर त्या सबलही झाल्या आहेत. मात्र त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार, बलात्काराच्या घटना पाहून, आता पुरुषांनाच सबल करण्याची गरज आहे, असे खळबळजनक विधान करीत प्रख्यात कादंबरीकार व कवयित्री कविता महाजन यांनी दारिद्र्यरेषेबरोबर आपल्याकडे कल्पना दारिद्र्याचीही रेषा आहे, त्यामुळे खऱ्या आणि वास्तववादी विकासाचे प्रतिबिंब उपेक्षित व पीडित घटकांमध्ये उमटत नाही, अशी खंत व्यक्त केली.
इस्लामपूर नगरपालिकेच्यावतीने आयोजित लोकनेते राजारामबापू पाटीलनगर व्याख्यानमालेत ‘बदलते समाजजीवन व माझे लेखन’ या विषयावर कविता महाजन यांनी तिसरे पुष्प गुंफून समारोप केला. सामाजिक एकात्मता टिकली पाहिजे यासह आर्थिक आणि संगणक क्रांतीवर भारत महासत्ता बनेल, याचा आशावाद जागवणाऱ्या दोन व्याख्यानांनंतर महाजन यांनी सामाजिक जीवनातील फोफावत चाललेल्या अमानवी व्यवहारावर कोरडे ओढले.
आपल्या लेखनाला वास्तवाची किनार असावी, या जाणिवेने आपण नक्षलवाद्यांच्या अड्ड्यावर, आदिवासींच्या पाड्यावर जाऊन राहिलो, असे सांगत महाजन म्हणाल्या की, तेथील कुपोषण, अनारोग्य, अन्नाचा अभाव पाहिल्यानंतर, प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधा देण्याच्या सरकारी घोषणेचे काय झाले? या भागामध्ये विकासाचे प्रचंड दुर्भिक्ष का? सरकारी योजना यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? मग अशा विभागास महाराष्ट्र आहे का? विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी या विकासामध्ये आदिवासींचे प्रतिबिंब उमटल्याचे पाहिले का? असे विविध प्रश्न उपस्थित होतात.
नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी स्वागत, तर माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील यांनी प्रास्ताविक केले. अण्णासाहेब डांगे, विलासराव शिंदे यांचीही भाषणे झाली. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन व परिचय करून दिला, तर नगरसेविका सौ. वैशाली हांडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
तो मला जगवत होता..!
सामाजिक संस्थेमध्ये काम करीत असताना आपणही एक एड्सग्रस्त मूल दत्तक घेतले होते. त्यावेळी मला, आपण एक मूल जगवत असल्याचा अहंकार सुखावत होता. एकेदिवशी हा मुलगा तापाने आजारी पडला. त्याला औषध देऊन मी कामावर गेले. सायंकाळी परतल्यावर त्याला खायला देण्यासाठी डाळिंब सोलले. तेवढ्यात त्याने मूठभर बिया उचलल्या. त्याच्या या कृतीने मी गोंधळले. मात्र त्याचक्षणी तो माझ्या मांडीवर येऊन बसला आणि डाळिंबाच्या बिया मला भरवू लागला. त्यावेळी मी त्याला जगवते, हा अहंकार गळून पडला आणि तो मला जगवतो आहे, याची जाणीव झाली. प्रेम करायला रक्ताचं आणि सेवा करायला कायद्याचं नातं लागत नाही, हे त्यादिवशी कळालं.