शस्त्रक्रियेला परवानगीच्या निषेधार्थ ‘आयएमए’चा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:21+5:302020-12-12T04:42:21+5:30
फोटो ११ आयएमए मिरज मिरजेत ‘आयएमए’च्या डॉक्टरांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. फोटो ११ जीपीए सांगली सांगलीत आयुर्वेदिक डॉक्टरांनी गुलाबी ...

शस्त्रक्रियेला परवानगीच्या निषेधार्थ ‘आयएमए’चा बंद
फोटो ११ आयएमए मिरज
मिरजेत ‘आयएमए’च्या डॉक्टरांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.
फोटो ११ जीपीए सांगली
सांगलीत आयुर्वेदिक डॉक्टरांनी गुलाबी फिती बांधून राजपत्राचे स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून ‘आयएमए’ने शुक्रवारी बंद पाळला. सांगलीत ४०० हून अधिक खासगी रुग्णालये बंद राहिली. कोविड उपचार व अतिदक्षता विभागांना बंदमधून वगळण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनाला शह देण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या आयुष संघटनेनेही दिवसभर पूर्ण क्षमतेने रुग्णसेवा दिली.
केंद्राच्या निर्णयामुळे महिन्याभरापासून आयएमए व आयुष संघटना आमनेसामने आल्या आहेत. आयएमएने शुक्रवारी देशव्यापी बंद जाहीर केला होता. त्यानुसार शहरातील सर्व खासगी ॲलोपॅथी रुग्णालये बंद राहिली. रुग्णसेवेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. खासगी रुग्णालये बंद राहिल्याने शासकीय रुग्णालयात गर्दी झाली. प्रशासनाने त्याची तयारी केली होती. त्यामुळे कोणतीही गंभीर समस्या उद्भवली नाही.
दरम्यान, या संपाविरोधात आयुर्वेदिक डॉक्टरांच्या आयुष संघटनेने गुलाबी फीत बांधून रुग्णसेवा दिली. शस्त्रक्रियेला परवानगीच्या राजपत्राचे स्वागत केले. शासनाच्या अभिनंदनाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. यावेळी डॉ. देवपाल बरगाले व डॉ. अभिषेक दिवाण, डॉ. सुधीर पाटील, डॉ. प्रशांत दाते, डॉ. सुरेश वाघ, डॉ. हर्षद माने, डॉ. बसंत बुर्ले, डॉ. फिरोज तांबोळी, डॉ. अनिल जुमराणी, डॉ. अभय देसाई, डॉ. आनंद पोळ आदी उपस्थित होते. रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू ठेवली.
चौकट
शश्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या
बाह्यरुग्ण विभाग पूर्णत: बंद राहिले. डॉक्टरांनी नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या होत्या. फक्त तातडीच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या. रुग्णालये शुक्रवारी बंद राहणार असल्याचे फलक आठवडाभरापासूनच लावले होते, त्यामुळे बाहेरगावाहून रुग्ण आले नाहीत.
--------