उमदीत खबऱ्याची खबर मिळते अवैध धंदेवाल्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:29+5:302021-06-30T04:17:29+5:30
उमदी : अवैध धंदे बंद करण्यासाठी अथवा गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांना खबऱ्याची नक्कीच गरज असते. यामुळे अनेक अवैध धंद्यासह गुन्हेगारांवर ...

उमदीत खबऱ्याची खबर मिळते अवैध धंदेवाल्यांना
उमदी : अवैध धंदे बंद करण्यासाठी अथवा गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांना खबऱ्याची नक्कीच गरज असते. यामुळे अनेक अवैध धंद्यासह गुन्हेगारांवर चाप बसतो. मात्र गुपचूप माहिती देणाऱ्या खबऱ्याचे नाव कदापिही उघड केले जात नाही. उमदी येथे मात्र चक्क एका हप्तेखोर पोलिसाकडून खबऱ्याचीच खबर अंवैध धंदेवाल्यांना देऊन खबऱ्याची खबर केल्याची खुमासदार चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी उमदी येथे दोन राजकीय गटात वादंग निर्माण झाले होते. उमदी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आपल्यावर कोणत्याही गोष्टींचे खापर फुटू नये, या उद्देशाने सर्व अवैध धंदे बंद करा, असे ठराविक पोलिस कर्मचारी यांना सांगितले. त्यामुळे वाळूचा हप्ता गोळा करणाऱ्या हप्तेखोर पोलिसाने आम्ही हप्ताही घेत नाही व वाळूच्या गाड्याही चालू देणार नाही, असा दम भरत चार दिवस वाळूचे ट्रॅक्टर बंद केले. नंतर काही ठराविक वाळूतस्करांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न होता हप्ते घेतले. गुपचूप कुणाला माहिती होणार नाही, अशा पद्धतीने गाड्या चालू करा असा सल्ला अवैध व्यावसायिकांना दिला. मात्र वाळूचे ट्रॅक्टर चालू झाल्यानंतर एका खबऱ्याने वाळूचे ट्रॅक्टर सुरू झाल्याचे हप्तेखोर पोलिसाला सांगितले. मात्र या हप्तेखोर पोलिस महाशयांनी ज्यांनी खबर दिली, त्यांचेच नाव त्या वाळूतस्करांना सांगण्याचा मोठा पराक्रमच केला. यावरून वाळूतस्कर, खबरी व हप्तेखोर पोलिस यांच्यात जोरदार तोंडी बाचाबाची झाल्याची खुमासदार चर्चा उमदी परिसरात रंगत आहे.