अवैध वाळू वाहतूक; दहा ट्रक पकडले

By Admin | Updated: February 12, 2015 00:34 IST2015-02-11T22:42:09+5:302015-02-12T00:34:26+5:30

मिरजेत प्रांताधिकाऱ्यांची कारवाई : सहा लाखांचा दंड

Illegal sand transport; Ten trucks caught | अवैध वाळू वाहतूक; दहा ट्रक पकडले

अवैध वाळू वाहतूक; दहा ट्रक पकडले

मिरज : प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी मिरज-पंढरपूर रस्त्यावर वाळूची अवैध वाहतूक करणारे दहा ट्रक पकडले. अवैध वाळू वाहतुकीबद्दल ट्रक मालकांवर सुमारे सहा लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असल्याने सांगली जिल्ह्यातील वाळू ठेक्यांच्या लिलावास प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे अवैध वाळू वाहतूक प्रतिबंधासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातून वाळू घेऊन येणारे सहा ट्रक मिरजेत पकडण्यात आले होते. मंगळवारी रात्री पंढरपूर रस्त्यावरून येणारे दहा ट्रक पकडण्यात आले. यातील चार ट्रक कवठेमहांकाळ तहसीलदारांकडे, तर सहा ट्रक मिरज तहसीलदारांकडे कारवाईसाठी पाठविण्यात आले. प्रति ब्रास दहा हजारप्रमाणे सुमारे सहा लाख रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात वाळू ठेके सुरू असून, तेथून मोठ्याप्रमाणात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात वाळूची आवक होते. मात्र वाळू वाहतुकीवर कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या वाळूवर परिणाम झाला आहे. रात्रीच्यावेळी होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने मोहीम सुरू केली आहे. (वार्ताहर)

बनावट किल्लीने ट्रक पळविला
अवैध वाळू वाहतूक करणारे सहा ट्रक ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले होते. यापैकी (एमएच ११/एल २0९३) या क्रमांकाच्या ट्रक चालकाने बनावट किल्लीचा वापर करून हा वाळूचा ट्रक पळवून नेला. आज सकाळी ट्रक गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंडल अधिकारी विजय ढेरे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर येथून सात ब्रास वाळूची अवैध वाहतूक करताना पकडलेला ट्रक पळवून नेला व वाळूचोरी केल्याबद्दल ट्रकचालक भालचंद्र माने (रा. सांगली) याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Illegal sand transport; Ten trucks caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.