मिरजेतील अॅपेक्स केअर रुग्णालयास नियमबाह्य परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:23+5:302021-06-22T04:19:23+5:30
मिरजेतील अॅपेक्स केअर कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी तब्बल ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. महेश जाधव यास ...

मिरजेतील अॅपेक्स केअर रुग्णालयास नियमबाह्य परवानगी
मिरजेतील अॅपेक्स केअर कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी तब्बल ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. महेश जाधव यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसानी अटक केली आहे. महापालिका प्रशासनाने गतवर्षी व यावर्षी साध्या अर्जावर डॉ. महेश जाधव यास तीन महिन्यांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. आयसीएमआरच्या निर्देशाप्रमाणे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी फिजिशियन, इंटेसिव्हिस्ट व इतर तज्ज्ञ डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, डॉ. महेश जाधव याच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी फिजिशियन व अन्य सुविधा नसतानाही महापालिका प्रशासनाने त्यास कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी कशी दिली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डाॅ. जाधव याने कागदोपत्री नियुक्त केलेल्या डाॅक्टरांनी येथील रुग्णांवर झालेल्या उपचाराबाबत हात झटकले आहेत. पोलिसांनी अॅपेक्स केअर कोविड रुग्णालयास नियमांनुसार परवानगी देण्यात आली होती का? याची विचारणा महापालिका प्रशासनास केली आहे. कोविड रुग्णालयास परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्यास जिल्ह्यातील टास्क फोर्सला त्याची तपासणी करण्याचे अधिकार आहेत. मात्र, अॅपेक्स कोविड रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूबाबत व बिलाच्या आकारणीबाबत वारंवार तक्रारी झाल्या. रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुग्णालयातील साहित्याची मोडतोडीचे प्रकार घडल्यानंतरही टास्क फोर्सने याची चाैकशी केलेली नाही. डाॅ. जाधव याने आर्थिक फायद्यासाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी एमडी मेडिसीन डाॅक्टरांसह अन्य काही डाॅक्टरांची कागदोपत्री नियुक्ती दाखवून परवानगी घेतल्याचे स्पष्ट होत असल्याने याची पोलिसांनी चाैकशी सुरू केली आहे.