बेकायदा दारूविक्री; पाच जणांना अटक
By Admin | Updated: December 18, 2014 00:01 IST2014-12-17T23:40:43+5:302014-12-18T00:01:57+5:30
सांगली-नांद्रेत छापे : ‘उत्पादन’ची कारवाई

बेकायदा दारूविक्री; पाच जणांना अटक
सांगली : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज (बुधवार) नांद्रे, सांगली येथे छापे टाकून बेकायदा दारू विकणाऱ्या पाच जणांना अटक केली. यामध्ये एका महिलेचा समावेश असून, या छाप्यात दोन दुचाकी व ४५ हजारांची देशी आणि गावठी दारू जप्त करण्यात आली.
उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने आज नांद्रे व सांगलीतील इंदिरानगर झोपडपट्टीत बेकायदा दारु विक्री व गावठी दारू अड्यावर छापे टाकले. या छाप्यामध्ये बाबासाहेब दादा जाधव (वय २१), शिरीष राजू घाळगे (२०), कल्पना बंडू घाळगे (४०, सर्व रा. अंकली, ता. मिरज), रामा शिवलिंग नाईक (३८, रा. नांद्रे), विजय बाबूराव तुंगे (४५, रा. सांगली) आदींना अटक करण्यात आली. याबाबत विश्रामबाग व सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर ४५ हजारांची गावठी व देशी दारू जप्त करण्यात आली. (प्रतिनिधी)
डिसेंबर महिन्यामध्ये बेकायदा दारूची आवक खूप वाढत असते. त्याचबरोबर ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय दारूचीही मोठ्याप्रमाणात आवक होत असते. यामुळे कारवाई सुरू आहे.