कुकटोळीतील प्राचीन बौद्ध लेणी दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:43+5:302021-06-09T04:33:43+5:30
फोटो ओळ : कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील गिरीलिंग डोंगरावर आढळून आलेल्या प्राचीन बौद्ध लेणी. महेश देसाई शिरढोण : जिल्ह्याच्या ...

कुकटोळीतील प्राचीन बौद्ध लेणी दुर्लक्षित
फोटो ओळ : कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील गिरीलिंग डोंगरावर आढळून आलेल्या प्राचीन बौद्ध लेणी.
महेश देसाई
शिरढोण : जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारी कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील गिरीलिंग डोंगरावरील प्राचीन असलेल्या बौद्ध लेणी दुर्लक्षित आहेत. पुरातत्त्व विभागाने याकडे लक्ष देऊन त्यांचे संवर्धन केले पाहिजे.
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी चार वर्षांपूर्वी हा ऐतिहासिक लेणीसमूह शोधून काढला होता. स्तूपयुक्त लेणी आणि विहार यांच्याबरोबरच पाण्याच्या टाक्या येथे आढळून आल्या आहेत. इ. स. पहिल्या ते तिसऱ्या शतकापर्यंत या लेणी खोदण्यात आल्या असाव्यात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
कुकटोळी येथील पूर्व-पश्चिम पसरलेल्या डोंगराला गिरीलिंग अथवा जुना पन्हाळा या नावाने ओळखले जाते. हा डोंगर पश्चिमेकडे गिरीलिंग डोंगर आणि पूर्वेकडे गौसिद्ध डोंगर अशा दोन भागांत विभागला आहे. या दोन विभागांच्या अगदी सीमेवर दगडी तटबंदीसारखी रचना आहे. त्याला ‘जुन्या पन्हाळ्य़ाचा खंदक’ असे स्थानिक लोक संबोधतात. मिरज ते जत आणि पुढे विजापूर या प्राचीन मार्गालगत ही लेणी वसली आहे.
यापैकी गिरीलिंग आणि गौसिद्ध या नावाने ओळखली जाणारी दोन लेणी स्थानिक ग्रामस्थांमध्ये परिचित असली तरी या दोन लेणींसह याठिकाणी असणाऱ्या अन्य चार लेणी आजवर प्रसिद्धीस आल्या नव्हत्या.
गिरीलिंग डोंगरावरील नव्या सहा लेणींच्या शोधामुळे जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश पडला आहे. मात्र, सध्या या लेणी दुर्लक्षित आहेत. या लेणींचे पुरातत्त्व विभागाने संवर्धन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
चौकट
पहिल्या ते तिसऱ्या शतकापासून विकास
चैत्यगृह आणि विहार या प्रकारातील या लेणी आहेत. यापैकी काही लेणींमध्ये कोणतेच कोरीव काम अथवा शिल्पावशेष नाहीत, तर काही लेणींमधील शिल्पावशेष अन्यत्र हलवण्यात आल्याचे दिसते. प्राथमिक अभ्यासात या लेणींचा विकास पहिल्या ते तिसऱ्या शतकापासून होत यादवकाळात यापैकी एका लेणीत मंदिराचे बांधकाम झाल्याचे दिसत असल्याचे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी सांगितले.