तासगावातील झोपडपट्टी पुनर्वसनाकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: October 16, 2015 00:52 IST2015-10-15T23:18:55+5:302015-10-16T00:52:44+5:30
झोपडपट्टीमुक्त तासगावची अपेक्षा : घरकुलाची समस्या प्रलंबित

तासगावातील झोपडपट्टी पुनर्वसनाकडे दुर्लक्ष
दत्ता पाटील --तासगाव शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर देण्यासाठी नगरपालिकेने इंदिरानगर येथे घरकुलाची उभारणी केली. मात्र घरकुलाची समस्या कायम आहे. तसेच अजूनही अडीचशेच्या वर कुटुंबे तासगाव शहरात झोपडपट्टीत वास्तव्य करीत आहेत. झोपडपट्टीधारकांचे रखडलेले पुनर्वसन केव्हा होणार? असा प्रश्न उपस्थित होत असून झोपडपट्टीमुक्त तासगावची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तासगाव शहरातील झोपडपट्टीधारकांचा सहा वर्षापूर्वी सर्व्हे झाला होता. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्णय झाला होता. केंद्र शासनाच्या योजनेतून तब्बल पाच कोटी रुपये खर्चून इंदिरानगर परिसरात ३९३ घरकुले उभारण्यात आली. या घरकुलांचा लाभ देण्यासाठी झोपडपट्टीधारकांची नावे नगरपालिकेकडून निश्चित करण्यात आली होती. मात्र अद्यापही संबंधित लाभार्थ्यांना या घरकुलांचे अधिकृत वाटप करण्यात आलेले नाही. तसेच बहुतांश लोक बेकायदा घरकुलात राहत आहेत. पालिकेतील कारभाऱ्यांच्या उदासीनतेमुळे झोपडपट्टीचा प्रश्न निकालात निघालेला नाही.
घरकुलात झोपडपट्टीधारकांचे पुनवर्सन झाले तरीही शहरात आणखी सुमारे अडीचशे झोपडपट्टीधारक आहेत. चिंचणी नाका, पुणदी रोड, साठेनगर, कांबळेवाडीसह शहरात अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे. या झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर देऊन शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नेतृत्व बदललेले पालिकेचे कारभारी काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत असून, झोपडपट्टी मुक्तीसाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घरकुलांच्या सुधारणेचे काय?
मंजूर झालेल्या झोपडपट्टीधारकांना घरकुलाचे वाटप करण्याचा ठराव अनेकदा पालिकेच्या सभेत झाला. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. घरांचे वाटप होण्यापूर्वीच या घरकुलांची दुरवस्था झालेली आहे. या घरकुलांची सुधारणा पालिका करुन देणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.