वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल, तर होऊ शकते पोलीस ठाण्याची वारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:37+5:302021-09-18T04:29:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट...’ म्हणत जर तुम्ही रस्त्यावरच वाढदिवसाचा बार फोडणार असाल, ...

If you celebrate your birthday on the street, it may be the turn of the police station! | वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल, तर होऊ शकते पोलीस ठाण्याची वारी!

वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल, तर होऊ शकते पोलीस ठाण्याची वारी!

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ‘ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट...’ म्हणत जर तुम्ही रस्त्यावरच वाढदिवसाचा बार फोडणार असाल, तर सावधान... रस्त्यावर वाढदिवस साजरा करत नेतेपणाची हाैस भागवून घेतली तरी वर्षाचा तुमचा अविस्मरणीय दिवस पोलीस कोठडीतही जाऊ शकतो. पोलिसांनी हुल्लडबाजी करत रस्त्यावर वाढदिवस करणाऱ्यांवर वचक बसविला असून, रात्री दंगामस्ती करत वाढदिवस साजरा करणाऱ्यांना लगाम बसला आहे.

शहरातील गल्लीबोळांतील फाळकूट दादांना रात्रीच्या वेळी शांतताभंग करून वाढदिवस साजरा करण्याची भलतीच हौस असते. मात्र, कोरोना अगोदरच शहर पोलिसांनी अशा स्वयंघोषित दादांना तोंडाला थापलेल्या केकसह पोलीस कोठडीची सफर दाखविल्याने अनेकांची रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याची हवा गुल झाली आहे. त्यामुळे वर्षभरात अशी एकही नोंद झालेली नाही.

चौकट

...तर गुन्हा दाखल

* रस्त्यावर वाहन उभे करून केक कापणे.

* तलवारीने केक कापणे.

* डीजे-गाणी लावून रस्त्यावर गोंधळ घालणे.

* यासह रात्रीच्या वेळी फटाके फोडून शांतताभंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येतो. यासाठी पेट्रोलिंगवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात येते.

चौकट

रस्त्यावर दंगा नकोच

शहरातील तीनही पोलीस ठाण्यांच्या वतीने रात्री विशेष गस्त सुरू असते. त्यात नियंत्रण कक्षात अथवा पोलीस ठाण्यात कोणी कॉल करून तक्रार केल्यासही पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई करतात. त्यामुळे उत्साहाच्या भरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे महागात पडू शकते.

कोट

रात्रीच्या वेळी शांततेचा भंग होऊ नये यासह अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी नियमित गस्त सुरू असते. त्यामुळे कोणीही नियमभंग करून गर्दी जमवून रस्त्यावर वाढदिवस साजरा करू नये. असे प्रकार घडल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

-अजित टिके, पोलीस उपअधीक्षक

Web Title: If you celebrate your birthday on the street, it may be the turn of the police station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.