यात्रेवेळी वीजचोरी केल्यास गुन्हे दाखल करू
By Admin | Updated: March 18, 2015 23:56 IST2015-03-18T23:53:23+5:302015-03-18T23:56:01+5:30
कवठेमहांकाळ प्रांताधिकाऱ्यांचा इशारा : आरेवाडीत बिरोबा यात्रा नियोजनाची बैठक

यात्रेवेळी वीजचोरी केल्यास गुन्हे दाखल करू
ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा यात्रेत भाविकांची गैरसोय होता कामा नये. तसेच भाविकांनी आकडा टाकून विजेची चोरी करू नये. तसे आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिला. तसेच यात्रा कालावधीमध्ये अखंडित वीज पुरवठा सुरु ठेवण्याचे आदेशही महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्री बिरोबा देवाची यात्रा दि. २५, २६ व २७ मार्चरोजी होणार आहे. त्यानिमित्ताने यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजता नियोजन समितीची बैठक प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली नव्यानेच बांधलेल्या भक्त निवासामध्ये पार पडली.
यात्रा काळात पाण्याची कमतरता पडू नये यासाठी आरेवाडी, रायेवाडी, ढालगाव या परिसरातील वीज पुरवठा खंडित करु नये, असे वीज वितरण कंपनीचे अधिकारी कोकणे यांना प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले. श्री महांकाली साखर कारखान्यामार्फत नाममात्र शुल्कात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बनातील दगडी व इतर सात टाक्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी सोय केली जाणार आहे. मात्र आकडे टाकून वीज घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी निकम यांनी पोलिसांना दिले. तसेच पोलीस दोनशे फुटाबाहेर असतील, असेही ते म्हणाले.
आरोग्य विभागाच्या प्रभारी तालुकाप्रमुख संगीता देशमुख यांनी, स्वाईन फ्लूबाबत डिजिटल पोस्टर लावून मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. आगारप्रमुख किरण कांबळे म्हणाले की, एसटीमार्फत चार शेड उभारुन ९0 बसेस सोडण्यात येतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माधव चव्हाण म्हणाले की, यात्राकाळात दारूची दुकाने बंद राहतील. अग्निशमन दल मागवले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यावरील झुडपे काढून खडे भरले जाणार आहेत.
बैठकीस तहसीलदार सचिन डोंगरे, उपसभापती गजानन कोळेकर, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, ‘महांकाली’चे कार्यकारी संचालक मनोज सगरे, देवस्थान समिती अध्यक्ष कोंडीबा कोळेकर, उपसरपंच अनिल कोळेकर, पो.नि. युवराज मोहिते, शिवाजीराव कोळेकर, काशिलिंग कोळेकर, एन. टी. कोळेकर उपस्थित होते. (वार्ताहर)
४आरोग्य विभागामार्फत अधिकाऱ्यांना मास्क देणार
४दोनशे स्वयंसेवकांना यात्रा समितीमार्फत ओळखपत्र देणार
४पोलिसांना २00 फुटाबाहेर व्यवस्थापन करण्याचे आदेश
४प्रमाणाबाहेर भाविकांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाई करणार
४अवैध गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांवर कारवाई
४२५ मार्च गोडवा नैवेद्य, २६ ला सार्वजनिक नैवेद्य, तर २७ ला यात्रेचा मुख्य दिवस