संजयकाका मंत्री व्हायचे असतील तर त्यांना मठात न्यावे लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:32 IST2021-09-10T04:32:29+5:302021-09-10T04:32:29+5:30
सांगली : खासदार संजय पाटील यांना कोणीतरी मठात न्या, त्याशिवाय ते मंत्री होणार नाहीत, असा गंमतीचा सल्ला केंद्रीय पंचायत ...

संजयकाका मंत्री व्हायचे असतील तर त्यांना मठात न्यावे लागेल
सांगली : खासदार संजय पाटील यांना कोणीतरी मठात न्या, त्याशिवाय ते मंत्री होणार नाहीत, असा गंमतीचा सल्ला केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी दिला. कसबे डिग्रज येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात ते बोलत होते.
कपिल पाटील म्हणाले, योगी आदित्यनाथ यांना संजयकाका पाटील यांनी किल्ले मच्छिंद्रनाथाच्या मठात नेले आणि ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. काकांनी मलाही त्याच मठात नेले आणि मीदेखील केंद्रात मंत्री झालो. आता काकांनाही कोणीतरी मठात नेले पाहिजे. ते स्वत: अनेकदा जात असले तरी दुसऱ्या कोणीतरी न्यावे लागेल.
चौकट
काकांचे सगळे देव फिरून झालेत
जयंत पाटील म्हणाले की, राज्यपाल हिमाचल प्रदेशातून आले आहेत, त्यावर खासदार पाटील यांनी गडबडीने खुलासा केला की, राज्यपाल उत्तराखंडचे आहेत. यावर जयंत पाटील खळखळून हसत म्हणाले, संजयकाकांचे उत्तराखंडमधील सगळे देव फिरून झाले आहेत, त्यामुळे कोठे कोण आहे याची त्यांना पूर्ण माहिती आहे. किल्ले मच्छिंद्रगड येथे मच्छिंद्रनाथाचे स्थान आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्यापूर्वी एकदा तेथे आले होते. त्यावेळच्या फोटोत योगींसोबत तरुण संजयकाका पाटीलही दिसतात. मच्छिंद्रनाथ व शिराळ्यात जुनी व ताकदवान ठिकाणे आहेत. आम्ही ती पर्यटनदृष्ट्या विकसित करतोय. तेथे राज्यपालांनी भेट द्यावी.