धोकादायक गटार तत्काळ दुरुस्त न केल्यास महापालिकेवर गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:18+5:302021-02-08T04:23:18+5:30
मिरज बसस्थानक ते मिरज रेल्वेस्थानक रस्त्यावर महापालिकेने दुतर्फा गटारीचे बांधकाम काम सुरू केले आहे. त्याचा पंचनामा सांगली जिल्हा ...

धोकादायक गटार तत्काळ दुरुस्त न केल्यास महापालिकेवर गुन्हा दाखल करणार
मिरज बसस्थानक ते मिरज रेल्वेस्थानक रस्त्यावर महापालिकेने दुतर्फा गटारीचे बांधकाम काम सुरू केले आहे. त्याचा पंचनामा सांगली जिल्हा सुधार समितीने केला. मात्र या कामाची सुरुवात व शेवट कोठे आहे. तेच समजून येत नाही. रस्त्याच्या मध्ये दोन्ही बाजूस सुमारे पन्नास मीटर चरी काढून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला सिमेंट कॉंक्रीट चरीच्या कामातून सळ्या बाहेर आल्या आहेत. या चरीमध्ये मैलामिश्रित पाणी साठून मोठे डबके तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून त्यांच्या जागेत जाणे-येणे कठीण झाले आहे. धोकादायक चरीत पडून अनेकजण जखमी झाले आहेत. रहदारीच्या या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस दवाखाने, हॉटेल, दुकाने, रहिवासी क्षेत्र व खाद्यपदार्थांचे हातगाडे आहेत. या सर्वांना या चरीमुळे जाण्या-येण्यास धोका निर्माण झाला आहे. मैलामिश्रित पाणी साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मैलामिश्रित पाण्यात डास, अळ्या तयार होत असल्याने रोगराईचा धोका आहे. गटारी खोदताना पाण्याच्या पाइपलाइन तुटल्याने नागरिकांना पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे.
पंचनाम्यावेळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत कैफियत मांडली. याबाबत अमित शिंदे यांनी महापालिका अभियंता व उपमहापौर आनंदा देवमाने यांच्याशी संपर्क साधून अर्धवट गटारीचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. हे काम तातडीने पूर्ण करावे किंवा चरी बुजवून टाकाव्यात. अन्यथा जीवितास धोका निर्माण केल्याबाबत महापालिकेविरुद्ध गुन्हा दाखल करून तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. याबाबत दोन दिवसात नागरिकांच्या सह्यांची रितसर तक्रार मिरज शहर पोलिसात देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी रोहित शिंदे, युवराज नायकवडे, नितीन मोरे, जयंत जाधव, महालिंग हेगडे, अल्ताफ पटेल, अरुणा शिंदे, नौशाद मुल्ला व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
फाेटाे : ०७ मिरज १