नाराज असलो तरी, काँग्रेससोबतच!

By Admin | Updated: November 11, 2016 23:16 IST2016-11-11T23:00:03+5:302016-11-11T23:16:30+5:30

विशाल पाटील : लोकसभेला जे पेरले तेच आता उगविले

If angry, with Congress! | नाराज असलो तरी, काँग्रेससोबतच!

नाराज असलो तरी, काँग्रेससोबतच!

सांगली : जिल्ह्यातील विविध निवडणुका, महापालिकेचा कारभार, पर्क्षंतर्गत गटबाजीबद्दल जी नाराजी होती, ती नाराजी वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली आहे. लोकसभेवेळी जे पेरले, ते विधानपरिषदेवेळी उगविल्याची टीका वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी, आमदार पतंगराव कदम यांचे नाव न घेता केली. माझी नाराजी दूर झाली तरी सोबत असलेल्या नगरसेवकांची नाराजी दूर होईलच असे नाही. नाराज असलो तरी, काँग्रेससोबतच राहणार, असेही ते म्हणाले.
सांगली- सातारा विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्याविरोधात विशाल पाटील गटाकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. या बंडाळीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, माझ्यासह आमच्या गटातील नगरसेवकांची वेगवेगळ्या अंगाने नाराजी आहे. नाराजी असू नये, असे होत नाही. माझी नाराजी दूर झाली आहे. त्यांची होईलच असे नाही. तरीही ते नाराज असले तरी काँग्रेससोबतच राहावेत, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी शिष्टाईही करणार आहोत. १३ नोव्हेंबर रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सांगलीत येत आहेत. विधानपरिषद निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा होईल की नाही, हे निश्चित नाही. पण आमच्या नाराजीबद्दल चव्हाण यांनी आदेश देण्याची आवश्यकता नाही. आम्ही पक्षासोबतच आहोत, असे पाटील म्हणाले.
महापालिकेतील स्वाभिमानी आघाडीने प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करण्याचा आग्रह धरला आहे. महापौर निवडीवेळी या आघाडीने काँग्रेसला साथ दिली होती. चांगल्या कामाबद्दल ते काँग्रेससोबत आहेत. पण सध्याच्या महापालिकेतील कारभाराबद्दल नगरसेवक, स्वाभिमानी आघाडी नाखूश आहे. भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. शहराचा विकास बाजूला राहून काही मंडळी आपलाच हेतू साध्य करीत आहेत. त्याला नेतेमंडळीही पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांचे नाव न घेता केली. (प्रतिनिधी)

पदाधिकारी बदला

महापालिकेतील भ्रष्ट कारभाराला पदाधिकारीच जबाबदार असून या पदाधिकाऱ्यांना नेत्यांनी बाजूला सारले पाहिजे. पण ते पालिकेत होताना दिसत नाही. पदाधिकाऱ्यांच्या चुकांचे खापर त्या नेत्यांवर फोडता येणार नाही. त्यासाठी अजून वेळ गेलेली नाही. पालिकेच्या निवडणुका दीड वर्षांनी आहेत. तत्पूर्वी पदाधिकारी बदल करावेत, असा सल्लाही विशाल पाटील यांनी पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांना दिला.

 

Web Title: If angry, with Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.