इद्रिस नायकवडी यांचे निलंबन मागे
By Admin | Updated: September 16, 2015 00:16 IST2015-09-16T00:09:00+5:302015-09-16T00:16:56+5:30
राष्ट्रवादीचा निर्णय : पक्षात सक्रिय होण्याचे संकेत

इद्रिस नायकवडी यांचे निलंबन मागे
सांगली : माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यावर पक्षविरोधी कारवायांबद्दल दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने निलंबनाची कारवाई केली होती. मंगळवारी राष्ट्रवादीने त्यांचे निलंबन मागे घेतले. त्यामुळे आता ते पक्षात पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.
विकास महाआघाडीच्या सत्ताकाळात इद्रिस नायकवडी यांना महापौर पदाची संधी देण्यात आली. तेव्हा नायकवडी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्षही होते. सत्तेच्या शेवटच्या वर्षभरात नायकवडी व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यात संघर्ष निर्माण झाला. नायकवडी यांनी महापौर पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजीनाम्याचे आदेश दिले होते. पण त्याला नायकवडी यांनी कोलदांडा देत काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचेही कौतुक केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
त्यानंतर महापालिका निवडणुकीत नायकवडी यांनी काँग्रेसशी संधान साधले. त्यांचे पुत्र अतहर यांच्यासह कुटुंबातील दोघांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवित जिंकली. पण काँग्रेसमध्येही ते फारसे रमलेले नाहीत. सध्या त्यांनी महापालिकेतील काँग्रेस नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वी इद्रिस नायकवडी व इलियास नायकवडी यांचे जयंतरावांशीही सूर जुळल्याची चर्चा सुरू होती.
महापालिकेत काँग्रेसअंतर्गत मदन पाटील व पतंगराव कदम गट कार्यरत असून, नायकवडी हे कदम गटाचे नेतृत्व करीत आहेत. त्यात त्यांचे राष्ट्रवादीचे निलंबन रद्द झाले आहे. तसे पत्र प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी त्यांना पाठविले आहे. नायकवडी यांचे निलंबन वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून रद्द केले असून, ते पूर्वीप्रमाणे पक्षाचे सदस्य म्हणून काम करतील, असे पत्रात म्हटले आहे. या पत्राची एक प्रत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनाही पाठविण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या या पत्रामुळे नायकवडी राष्ट्रवादीत सक्रिय होण्याचे संकेत मिळत असून, महापालिकेसह पक्षाच्या कार्यकारिणीतील गणितेही बदलणार आहेत. (प्रतिनिधी)