स्वच्छता ठेका, नामकरणावरून वादळी चचा
By Admin | Updated: March 11, 2015 00:07 IST2015-03-10T23:30:41+5:302015-03-11T00:07:01+5:30
इस्लामपूर पालिका सभा : खुल्या नाट्यगृहाला जयंत पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर्र

स्वच्छता ठेका, नामकरणावरून वादळी चचा
इस्लामपूर : स्वच्छता ठेक्याच्या विषयावरून सत्तारूढ व विरोधकांत ठेकेदाराच्या हाताखाली काम करण्याच्या वक्तव्यावरून झालेले वादंग आणि खुल्या नाट्यगृहाच्या नामकरणावरून आदराची भावना ठेवत रंगलेले वाक्युध्द अशा कधी गंभीर, तर कधी नर्म विनोदी शेरेबाजीत पालिकेची विशेष सभा गाजली. जंतुनाशक खरेदीवरून सोलापूरच्या दिवाणी न्यायालयाच्या निकालावर पुढील सर्वसाधारण सभेत चर्चा करण्याचा निर्णय झाला. ही सभा तब्बल सव्वातीन तास चालली.
नगरपालिका सभागृहात आज नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी निलेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही विशेष सभा झाली. विषयांना थेट विरोध, हरकत, सभात्याग अशा संसदीय आयुधांचा वापर करीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मोठ्या वादळी चर्चेनंतर खुल्या नाट्यगृहाला आमदार जयंत पाटील यांचे नाव देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.सभेच्या सुरुवातीला वारसा हक्काने नियुक्ती देण्याचा विषय चर्चेला आल्यावर ज्येष्ठ सदस्य बी. ए. पाटील यांनी मूळ कर्मचाऱ्यांनी सफाई कर्मचारी म्हणून पूर्णवेळ काम केले आहे का? इतर विभागात काम करीत होते का? मग त्यांच्या वारसांना सेवेत नियुक्ती कशी देणार, असे विचारत विरोध केला. बांधकामच्या विषयावर अग्निशमन दलाच्या कर्मचारी वसाहतीचे रेखांकन निकषानुसार आहे का? या पाटील यांच्या प्रश्नावर मुख्याधिकारी देशमुख यांनी अग्निशमन संचलनालयाने ठरवून दिलेल्या आराखड्यानुसार बांधकाम सुरु आहे, असा खुलासा केला. त्यावर बी. ए. पाटील यांनी या आराखड्यात अनियमितता असून, पुनर्विचार करा, असे मत नोंदवले.
स्वच्छता ठेक्याचा विषय चर्चेला आल्यावर पुन्हा बी. ए. पाटील यांनी ठेकेदाराचा दरवाढ मिळण्याचा अर्ज केव्हा आला. तो गेल्या ६ महिन्यांपासून सभागृहासमोर का आला नाही, अश्ी विचारणा केली. विरोधी सदस्यांनी ठेकेदार कोरे यांना महिन्याला ठराविक रक्कम देऊन पालिकेनेच नियोजन करावे, असे मत नोंदवले. यावेळी सभागृहाचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी विरोधी गटाच्या कुंभार यांना एकेरी भाषा वापरत तू कोरेंच्या हाताखाली जा, असा टोला मारल्यावर कुंभार यांनीही तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करा, असा प्रतिटोला मारला. यावेळी वातावरण गंभीर बनले होते. त्यात हस्तक्षेप करीत बी. ए. पाटील यांनी सभागृहाची अप्रतिष्ठा होत असेल तर, सदस्यांना सभ्यतेची प्रेमपत्रे द्या, अशी मिश्कील टिप्पणी केली. १० टक्के दरवाढ देऊन ठेक्याला मुदतवाढ देण्यात आली.
खुल्या नाट्यगृहाच्या नामकरणावेळी बी. ए. पाटील, चंद्रकांत पाटील यांनी सभात्याग केला. नियोजन सभापती खंडेराव जाधव यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारा अर्ज दिला होता. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शिवसेनेच्या आनंदराव पवार यांनी यापूर्वी किती संघटना व सामाजिक संस्थांनी नामकरणाची मागणी केली होती, अशी विचारणा करीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा आग्रह धरला. त्यानंतर विरोधी सदस्यांकडून माजी नगराध्यक्ष अशोकदादा पाटील यांचे नाव देण्याचा अर्ज चर्चेला आला. त्यावेळी कुंभार यांनी शहराचा स्वाभिमान जपण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून निर्णय घ्या, असे आवाहन केले. सत्तारूढ गटाच्या खंडेराव जाधव यांनी या सभागृहात कुणाचा अनादर करण्याची आमची इच्छा नाही. दादा शहराला आणि सभागृहालाही आदरणीय आहेत. त्यांच्या नावासाठी आम्ही अग्रेसर राहू, असे सांगितले.
विजयभाऊ पाटील म्हणाले, राष्ट्रवादीनेच शिवछत्रपतींचा पुतळा उभारला आहे. आता अण्णाभाऊ साठे यांचेही स्मारक करू. अशोकदादांचे नाव एखाद्या चांगल्या विकासकामाला देण्याबाबत विचार करू. (वार्ताहर)
उपनगराध्यक्ष अनुपस्थित..!
शहरातील बहुचर्चित जंतुनाशक खरेदीची चौकशी करण्याची जबाबदारी तत्कालीन सभागृहाने उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्यावर सोपवली होती. त्यावेळी विजय कोळेकर हे आरोग्य सभापती होते. कोरे यांनी सर्व कागदपत्रांची छाननीही केली होती, मात्र सभागृहाला त्यांनी अहवाल दिलेला नाही. आज हा वादग्रस्त विषय पुन्हा चर्चेला होता, मात्र कोरे यांनी सभेला अनुपस्थिती दर्शवल्याने या प्रकरणाचे गूढ पुन्हा वाढले आहे.
जंतुनाशक प्रकरणावर पुन्हा पडदा..!
२००५-०६ मध्ये झालेल्या वादग्रस्त जंतुनाशक खरेदी प्रकरणी सोलापूर न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत चर्चा झाली. जंतुनाशक पुरवठा करणाऱ्या कंपनीला २२ ते २३ लाख रुपये द्यावे लागतील, असे मुख्याधिकारी देशमुख यांनी सांगून सभागृहाने निर्णय घ्यावा, असे सूचवले. अॅड. चिमण डांगे म्हणाले, विद्यमान सभागृहाला त्रास होणार नाही, असा निर्णय घ्या. आनंदराव मलगुंडे यांनी त्या व्यापाऱ्यांशी तडजोड करून विषय मिटवा, अशी सूचना केली. नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी पुढच्या सर्वसाधारण सभेत हा विषय घेतला जाईल, असे सांगत चर्चेवर पडदा टाकला.