पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:57+5:302021-05-09T04:27:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मांगले/शिराळा : चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने पत्नीवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी फकीरवाडी (ता. ...

पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले/शिराळा : चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने पत्नीवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी फकीरवाडी (ता. शिराळा) येथील शिवारात घडली. त्यानंतर त्यानेही तणनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुवर्णा सुभाष पवार (वय २७), असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती सुभाष ऊर्फ बाबू सदाशिव पवार (३५) याच्यावर कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फकीरवाडीच्या पूर्वेला शिराळा-मांगले रस्त्यालगत सुभाष पवारचे घर आहे. पवार दाम्पत्याला दहा आणि सात वर्षाची दोन मुले आहेत. सुभाष नेहमी पत्नी सुवर्णाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दोघे जण दुचाकीवरून शिराळा-मांगले रस्त्यावरील नाळीचा ओढा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतात उसावर औषध फवारण्यासाठी गेले होते. काही वेळानंतर शेजारच्या ओढ्यात कपडे धूत असतानाच सुवर्णा औषध फवारणी करणाऱ्या सुभाषजवळ गेली. तेथे त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. सुभाषने रागाच्या भरात जवळ पडलेल्या ऊसतोडणीच्या कोयत्याने सुवर्णाच्या मानेवर, डोक्यावर वार केले. त्यात त्या जागीच ठार झाल्या. त्यानंतर शांतपणे सुभाषने घरी फोन करून भाऊ दिगंबर यांना पत्नीचा खून केल्याचे सांगितले.
भावासह नातेवाईक तातडीने घटनास्थळी धावले. त्यावेळी सुवर्णा रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण झाल्या होत्या, तर सुभाष जमिनीवर तडफडत होता. उसावर मारत असलेले तणनाशक प्राशन केल्याचे त्याने सांगितले. त्याच्या तोंडाला फेस येत होता. भावाने त्याला उपचारासाठी सुरुवातीला कोडोली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलीस पाटील तौफिक पिरजादे यांनी शिराळा पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. सुवर्णा यांचे माहेर शित्तूर वारूण (ता. शाहूवाडी) असून, दोन भाऊ, त्यांचे नातेवाईक व सात वर्षांचा मुलगा रुग्णालय परिसरात आले. त्यांना शोक अनावर झाला होता. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
दारू पिऊन त्रास, सासू-सासरे, दिरावरही गुन्हा
सुभाष पवार नेहमी मद्यप्राशन करून सुवर्णाला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. सासू सदाशिव, सासू बबूताई, दीर दिगंबर हेही वारंवार त्रास देत होते. त्यातूनच हा खून झाल्याची तक्रार सुवर्णाचे वडील भगवान श्रीपती पाटील (रा. शित्तूर-वारूण, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांनी दिली आहे. सुभाषसह सासरा सदाशिव, सासू बबूताई आणि दीर दिगंबर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत कोणालाही ताब्यात घेतले नव्हते.