मिरजेत पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:46+5:302021-07-20T04:19:46+5:30
मिरज : मिरजेतील टाकळी रस्त्यावर शिवम पार्क येथे चेतन आनंदा माने याने पत्नी पूजा चेतन माने (२५) हिचा ...

मिरजेत पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस अटक
मिरज : मिरजेतील टाकळी रस्त्यावर शिवम पार्क येथे चेतन आनंदा माने याने पत्नी पूजा चेतन माने (२५) हिचा दारूच्या नशेत चाकूने पोटावर, मांडीवर, पाठीवर चार वार करून रविवारी दुपारी निर्घृण खून केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी फरारी चेतन आनंदा माने (३२) यास पत्नीच्या खूनप्रकरणी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
टेलरिंगचे काम करणारा चेतन माने हा व्यसनाधीन असून त्याचे दारूच्या व्यसनामुळे पत्नीसोबत वारंवार भांडण हाेत होते. शिवम् पार्क परिसरात आई-वडील, मुलगा, दोन मुली व पत्नी असे कुटुंबीय एकत्रित राहत होते. रविवारी चेतनचे आई-वडील घरी नव्हते. चेतनने दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून पत्नी पूजा हिच्यासोबत भांडण काढले. पूजाच्या छातीवर, पोटावर, पाठीवर चाकूचे वार करून पलायन केले. चेतन याला दारूचे व्यसन असल्याने घराचा सर्व खर्च आई-वडील भंगार गोळा करून चालवत होते. पूर्वी टेलरिंग व्यवसाय करणारा चेतन माने हा पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला होता. रविवारी दुपारी त्याने चाकूने भोसकल्यानंतर पूजा हिला गंभीर जखमी अवस्थेत नातेवाइकांनी मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चेतन माने याला अटक केली आहे.