जत पूर्व भागात हुरडा पार्ट्यांचा जोर
By Admin | Updated: February 9, 2015 01:16 IST2015-02-09T01:06:02+5:302015-02-09T01:16:08+5:30
हंगाम बहरला : नेतेमंडळी, पै-पाहुण्यांंना निमंत्रणे

जत पूर्व भागात हुरडा पार्ट्यांचा जोर
दरीबडची : अनुकूल हवामान, आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची उगवण चांगली झाली. संपूर्ण शिवारभर पिके बहरली आहेत. सध्या पिके हुरड्यात आहेत. जत पूर्व भागातील शेतामध्ये तीन वर्षानंतर प्रथमच ज्वारी, मका पिकाचा हुरडा भाजण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. हुरडा खाण्यासाठी नेतेमंडळी, पै-पाहुणे, शासकीय नोकरवर्ग, मित्रमंडळींना आमंत्रणे दिली जात आहेत.
पाहुणचार म्हणून ज्वारी, मका पिके हुरड्यात आली की रानामध्ये हुरडा भाजायच्या शेकोट्या पेटविल्या जातात. हिरवीगार ज्वारी, मक्याचा हुरडा आहारातील सकस अन्न आहे. हुरडा भाजण्यासाठी रानामध्ये थोडा खड्डा काढून शेणाच्या गवऱ्या घालून पेटविले जाते. त्यात ज्वारीची कणसे भाजली जातात. तसेच मक्याचा हुरडा काटरे जळण, लहान लाकडाचे जळण पेटवून त्यावर कणसाचा पाला थोड्या प्रमाणात काढून भाजली जातात. पातेल्यात घालून कणसे शिजवलीही जातात.
हुरड्याबरोबरच शेंगदाणे, चटणी, मीठ, खोबरे असल्याने त्याचा चविष्टपणा वाढतो. गावात येणारा शासकीय अधिकारी, पाहुणा, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, नेतेमंडळी यांना सायंकाळी शेतावर बोलावून सध्या हुरडा पार्टी करून त्यांचा पाहुणचार केला जात आहे. (वार्ताहर)
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने ज्वारी, मकापिके चांगली आली आहेत. तीन वर्षानंतर पिके आल्याने हुरडा खायला मिळत आहे. हुरडा खाण्यासाठी आम्ही इतरांना आमंत्रण देतो. रानात भाजल्याने हुरडा चविष्ट लागतो.
- कामाण्णा पाटील, शेतकरी
हुरडा खाण्याची प्रथा कमी, शेतकऱ्यांचा व्यापारी पिके घेण्याकडे कल, संकरित बी-बियाणे, शहराकडे कामासाठी वाढत जाणारे लोंढे यामुळे हुरडा खाण्याची प्रथा हळूहळू कमी होऊ लागली आहे. निसर्गाचा लहरीपणा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे कुुटुंबाला पुरेल एवढेच उत्पादन शेतकरी घेऊ लागला आहे. व्यापारी पिके घेण्यासाठी कल वाढला आहे. संकरित बियाणांची लागवड केल्यामुळे पूर्वीसारखा चविष्ट हुरडा निघत नाही. यामुळेही हुरडा खाण्याची प्रथा कमी झाली आहे.