आठ कोटींच्या संगणक खरेदीच्या कागदपत्रांची शोधाशोध

By Admin | Updated: September 13, 2014 00:14 IST2014-09-13T00:12:26+5:302014-09-13T00:14:38+5:30

जिल्हा बँक : खरेदीवर चौकशीत आक्षेप; चौकशी अंतिम टप्प्यात, आठ दिवसात अहवाल सादर होणार

Hunt for computer purchase documents worth 80 crores | आठ कोटींच्या संगणक खरेदीच्या कागदपत्रांची शोधाशोध

आठ कोटींच्या संगणक खरेदीच्या कागदपत्रांची शोधाशोध

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कलम ८३ (१) खालील चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र बँकेने २०००-२००१ मध्ये केलेल्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या संगणक खरेदीची कागदपत्रेच चौकशी अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली नाहीत. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही या कागदपत्रांची शोधाशोध सुरू केली आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात चौकशीचा अहवाल कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांना सादर होणार असल्याचे समजते.
जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर २००१ ते २०१२ या कालावधीतील कामकाजाचे विभागीय सहनिबंधक डी. ए. चौगुले यांनी चाचणी लेखापरीक्षण केले होते. या चाचणी लेखापरीक्षणात गंभीर बाबी आढळून आल्या होत्या. त्यात बँकेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमावर झालेला खर्च, लेखी अथवा तोंडी परीक्षा न घेता केलेली नोकरभरती, पेठभाग, सावळज, आटपाडीसह सहा शाखांच्या इमारतीचे अंदाजपत्रकापेक्षा जादा दराने केलेले काम, वसंतदादा कारखान्यास बगॅस कर्जावरील बँक गॅरंटी परत करणे, जादा दराने सीसी टीव्ही कॅमेरे, सिक्युरिटी अलार्म सिस्टिम, जनरेटर खरेदी, एटीएम मशीन खरेदी, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना दिलेला अनावश्यक पगार, ओटीएसखाली आष्टा पश्चिम भाग विकास सोसायटीला दिलेली नियमबाह्य सूट, संचालक मंडळाचा अभ्यास दौरा आदी बाबींचा समावेश होता.
या गंभीर आक्षेपांची चौकशी करण्यासाठी कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांनी मिरज उपनिबंधक एम. एल. माळी यांची नियुक्ती केली होती. माळी यांनी गेल्या वर्षभरापासून चौकशीचे काम सुरू केले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चौकशीत पंधरापैकी अकरा मुद्द्यांवर फारशी गंभीर बाब आढळून आली नसल्याचे समजते. तसेच आठ कोटींच्या संगणक खरेदीबाबत मात्र संशय वाढला आहे. २०००-२००१ या काळात तत्कालीन संचालक मंडळाने ही संगणक खरेदी केली होती. सुरुवातीला एका वृत्तपत्रात जाहिरात देऊन संगणक खरेदी केली. त्याआधारावरच २१७ शाखांसाठी आठ कोटींची संगणक खरेदी करण्यात आली. त्यासाठी स्वतंत्ररित्या जाहिरात देऊन दरपत्रके मागविण्यात आली नव्हती. याबाबतची कागदपत्रे चौकशी अधिकाऱ्यांनी बँकेकडून मागविली आहेत. या कागदपत्रांचा बँकेच्या प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hunt for computer purchase documents worth 80 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.