मिरज : मिरजेत होळीच्या सणानिमित्त गोसावी समाजात महिलांनी पुरुषांना काठीने मारण्याची प्रथा आहे. होळीनिमित्त गोसावी समाजाचा काठीचा खेळ या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने पार पडला.
मिरजेत गोसावी समाजाच्या होळीत महिला पुरुषांना काठीने बदडून काढतात. शेकडो वर्षांची होळीची ही प्रथा मिरजेत अद्याप सुरू आहे. महाराष्ट्रात गोसावी समाज मोलमजुरी, भंगार व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. धार्मिक व रूढी परंपरावादी असल्याने गोसावी बांधव अनेक सण धार्मिक पद्धतीने साजरे करतात. मिरजेतील उत्तमनगर परिसरात गोसावी समाजातर्फे दरवर्षी उत्साहात होळी सण साजरा करण्यात येतो. होळीच्या तिसऱ्या दिवशी काठीचा खेळ खेळण्यात येतो. होळी पेटविलेल्या ठिकाणी महिला झेंडा घेऊन उभ्या राहतात. पुरुष हा झेंडा पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. झेंडा पळवून नेणाऱ्या पुरुषांना महिला काठीने बदडतात. होळीनिमित्त शेकडो वर्षांची ही झेंड्याच्या खेळाची परंपरा गोसावी समाजबांधवांनी टिकविली आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.