फोटो : १७ शीतल ०१. ०२. ०३ (वाय फोल्डरवर)
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाने रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर संसर्गाच्या भीतीने त्याच्या अंत्यसंस्कारांकडे नातेवाईक पाठ फिरवितात. अशा बिकट काळात या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मुस्लिम तरुणांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे २० हून अधिक तरुण गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या मृतांवर अंत्यसंस्कारांचे काम करीत आहेत. ‘इन्सानियत जिंदा रहनी चाहिए’ असे म्हणत ही तरुण मुले स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आजही राबत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जिल्ह्यातील स्थिती गंभीर बनली होती. कोरोनाच्या मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही कोणीच पुढे येत नव्हते. महापालिकेच्या स्मशानभूमीत हिंदू व्यक्तीवरील अंत्यसंस्काराची जबाबदारी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतली होती. नंतर या कामासाठी महापालिकेने खासगी ठेकेदार नियुक्त केला. पण मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत समाजातील व्यक्तीवरील अंत्यसंस्कारांचा प्रश्न कायम होता. अशा काळात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची तरुण मुले पुढे सरसावली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुलमजीद मुतवल्ली यांच्या नेतृत्वाखाली या तरुण मुलांनी अंत्यसंस्कारांची जबाबदारी खांद्यावर घेतली. आतापर्यंत ३०० हून अधिक अंत्यसंस्कार या मुलांनी केले आहेत. यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन समाजांतील व्यक्तींचाही समावेश आहे. त्या त्या धर्मानुसार तरुणांनी अंत्यविधी केले. धर्मभेद बाजूला सारून ‘इन्सानियत’ जिवंत ठेवण्यासाठी ही तरुण मुले धडपडत होती. त्यांनाही कोरोनाच्या संसर्गाची भीती होती. त्यासाठी आवश्यक ती काळजी त्यांनी घेतली. पीपीई किट घालून अंत्यविधीचे सोपस्कर पार पाडले. घरी परतल्यानंतर कुटुंबाची काळजीही त्यांनी घेतली आहे. या तरुणांनी समाजाला माणुसकीचा नवा मापदंडच घालून दिला आहे.