मालगावच्या ग्रामस्थांनी जागविली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:27 IST2021-05-19T04:27:47+5:302021-05-19T04:27:47+5:30
मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात ...

मालगावच्या ग्रामस्थांनी जागविली माणुसकी
मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या संस्था विलगीकरण कक्षासाठी दानशूरांनी मदतीचे हात पुढे करीत माणुसकी जागविली आहे. विलगीकरण केंद्रासाठी अन्नधान्य, अंडी, फळे, औषधे, सुरक्षिततेचे साहित्य असा मदतीचा ओघ सुरू आहे.
एस. एम. हायस्कूलमध्ये संस्था विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष गावस्तरावर दानशूरांच्या मदतीने सुरू आहे. अनेकजण भोजन व नाष्ट्याचे साहित्य, अंडी, गोडेतेलाचे डबे, फळे, औषधे, सॅनिटायझरसह उपचाराचे साहित्य, रुग्णांसाठी बेड अशी मदत करीत आहेत. या मदतीने विलगीकरण कक्षात बेडसह इतर सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने रुग्ण दाखल होत आहेत. या कक्षास तहसीलदार डी. एस. कुंभार, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, पंचायत समिती सदस्य काकासाहेब धामणे, माजी बांधकाम सभापती अरुण राजमाने यांनी भेट देऊन नियोजनाचे व दानशूर ग्रामस्थांचे कौतुक केले.
चौकट
रुग्णसेवेसाठी राबताहेत हात !
मदतीचे नियोजन करून रुग्णांना वेळेत नाष्टा, जेवण व आरोग्य तपासणी, अतित्रास होणाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपसरपंच तुषार खांडेकर, सदस्य अजित भंडे, शशिकांत कनवाडे, रवींद्र क्षीरसागर, तलाठी संजय खरात, ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे, डाॅ. बी. टी. पवार यांचे आरोग्यपथक कक्षात ठाण मांडून आहे.