कळंबी फाट्यावर पुन्हा साकारली हनुमानाची महाकाय मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST2021-07-14T04:30:54+5:302021-07-14T04:30:54+5:30
ओळ : नागपूर-रत्नागिरी महामार्गालगत मिरज-पंढरपूर रस्त्यावर कळंबी-सिध्देवाडी फाट्यावर शिल्पकार विजय गुजर यांनी २५ फुटी हनुमानाच्या मूर्तीची पुनर्स्थापना केली आहे. ...

कळंबी फाट्यावर पुन्हा साकारली हनुमानाची महाकाय मूर्ती
ओळ : नागपूर-रत्नागिरी महामार्गालगत मिरज-पंढरपूर रस्त्यावर कळंबी-सिध्देवाडी फाट्यावर शिल्पकार विजय गुजर यांनी २५ फुटी हनुमानाच्या मूर्तीची पुनर्स्थापना केली आहे.
-----------------
मालगाव : सिध्देवाडी-कळंबी फाट्यावर नागपूर-रत्नागिरी महामार्गालगत जागतिक कीर्तीचे शिल्पकार विजय गुजर यांनी हनुमान मूर्तीची पुनर्स्थापना केली आहे. मूर्तीच्या स्थापनेने या महामार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या दिंड्यातील वारकरी तसेच प्रवाशांना हनुमानाचे दर्शन होणार आहे.
जागतिक कीर्तीचे शिल्पकार विजय गुजर यांनी जुन्या मिरज-पंढरपूर मार्गावर सिध्देवाडी-कळंबी फाट्यालगत असणाऱ्या फार्महाऊसमध्ये प्रवाशांना सहजपणे दर्शन होईल अशा ठिकाणी सुमारे २५ फूट उंचीच्या भव्य हनुमान मूर्तीची स्थापना केली होती. वारकरी, प्रवासी व हनुमान भक्तांची व वाहनधारकांची ही मूर्ती श्रध्दास्थान बनली होती. नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी गुजर यांच्या मालकीच्या साडेतीन एकर जागेपैकी दीड एकर जमीन संपादित करण्यात आल्याने यामध्ये असलेली हनुमानाची मूर्ती काढावी लागली. गुजर यांनी ही मूर्ती आहे त्या ठिकाणी रहावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, ती हलविण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
मूर्ती दोन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने हलविताना मोठी कसरत करावी लागली. मूर्ती हलविल्यानंतर तिच्या अस्तित्वाची जाणीव हनुमान भक्तांना होत राहिली. मूर्ती पुनर्स्थापनेचा गुजर यांचा मनोदय होता. तो त्यांनी पूर्ण केला आहे. गुजर यांनी कळंबी फाट्यावर महामार्गाच्या पूर्वेला फार्महाऊसच्या उर्वरित जागेत मेहनतीने पुन्हा २५ फुटी आकर्षक हनुमान मूर्तीची नव्याने पुनर्स्थापना केली आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या मूर्तीच्या उभारणीने महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी, वारकरी, वाहनधारकांना हनुमानाचे दर्शन होणार आहे.
चौकट
मूर्तीला २० लाखांचा खर्च
महामार्गावरील सिध्देवाडी-कळंबी फाटा पुलाच्या पूर्वेला हनुमानाच्या २५ फुटी मूर्तीची स्थापना केली आहे. ही मूर्ती बनविण्यासाठी २० लाख रुपये खर्च आला. तीन महिन्यात मूर्तीचे काम पूर्ण झाल्याने तिचे सर्वांना दर्शन होत आहे. परिसर भक्तिमय होण्यासाठी पुलांच्या भिंतीवर संतांची तैलचित्रे काढण्यासाठी परवानगी मागितली असल्याचे जागतिक कीर्तीचे शिल्पकार विजय गुजर यांनी सांगितले.