म्हैसाळमध्ये दीड लाखाचे सोने लंपास
By Admin | Updated: June 23, 2014 00:51 IST2014-06-23T00:39:14+5:302014-06-23T00:51:09+5:30
दोघा चोरट्यांचे कृत्य : भरदिवसा चोरीने खळबळ

म्हैसाळमध्ये दीड लाखाचे सोने लंपास
मिरज : म्हैसाळ येथे सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनी दीड लाख किमतीचे साडेपाच तोळे दागिने लंपास केले. भरदिवसा सोने चोरीच्या घटनेमुळे म्हैसाळमध्ये खळबळ उडाली होती.
महात्मा चौकात राहुल सज्जनराव जाधव (रा. म्हैसाळ) यांचे सरस्वती ज्वेलर्स हे दुकान आहे. आज दुपारी चार वाजता ३० ते ४० वर्षे वयाचे दोन तरुण आले. काळी पॅन्ट, पांढरा शर्ट परिधान केलेल्या व हिंदीत बोलणाऱ्या दोघा तरुणांनी ३० रुपये किमतीचे चांदीचे डोळे खरेदी केले. त्यानंतर शोकेसमधील लाल खडा दाखविण्यास सांगितले. याचवेळी बंगाली भाषेत काही तरी मंत्र पुटपुटत दोघा भामट्यांनी जाधव यांचे लक्ष विचलित केले. खडा बघत असताना ड्रॉवरमधील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने असलेली पुडी त्यांनी हातोहात लंपास केली.
दोन्ही भामटे निघून गेल्यानंतर दागिन्यांची पुडी जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव हवालदिल झाले. त्यांनी चोरट्यांचा गावात व कुडचीपर्यंत जाऊ न शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पसार झाले. नेकलेस, सोन्याची नाणी असे साडेपाच तोळे सोने चोरुन नेल्याबद्दल राहुल जाधव यांनी अज्ञात भामट्यांविरुध्द मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)