कारखाने विकून सहकार कसा टिकेल?
By Admin | Updated: November 14, 2016 00:03 IST2016-11-14T00:03:34+5:302016-11-14T00:03:34+5:30
शिवराज पाटील : वसंतदादांच्या विचारानेच महाराष्ट्राची प्रगती साधता येईल

कारखाने विकून सहकार कसा टिकेल?
सांगली : तीनशे ते चारशे कोटींचे कारखाने अवघ्या चाळीस कोटी रुपयांना विकले गेले, तर सहकार कसा टिकणार?, असा सवाल करून, महाराष्ट्राची प्रगती वसंतदादांच्या विचारानेच होऊ शकते, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
येथे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मंत्री पतंगराव कदम, मधुकरराव चव्हाण, हर्षवर्धन पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आ. शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, आदी उपस्थित होते. वसंतदादा स्मारकस्थळी सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.
शिवराज पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांचे महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान आहे. त्यांचे विचार जपले तरच महाराष्ट्राची प्रगती होऊ शकते. अन्यथा सत्य आणि सत्ता यापासून आपल्याला दूरच राहावे लागेल. कारखानदारीचे ज्ञान आणि पैशाची उपलब्धता नसताना वसंतदादांसारख्या नेत्यांनी कारखाने उभे केले. सहकार चळवळीला बळ देऊन सामान्य लोकांच्या प्रगतीचे राजकारण केले. आता तशी सहकार चळवळ राहिलेली नाही. ज्यांच्यासाठी ही चळवळ सुरू केली, तेसुद्धा गप्प आहेत. शासनाच्या धोरणांमुळे सहकार मोडीत निघण्याची भीती व्यक्त होत आहे. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या आणि अन्य कारखाने, उद्योग आता अडचणीत आले आहेत. ही परिस्थिती बदलली पाहिजे.
ते म्हणाले, सहकारी साखर कारखाने सध्या कवडीमोल दराने विकले जात आहेत. अशा घटनांमधून काळ्या पैशाचीच निर्मिती होणार आहे. त्यामुळे प्रथम आपणच या गोष्टी थांबविल्या पाहिजेत.
कापूस एकाधिकार योजना, बाजार समित्यांचे अस्तित्व आता नाहीसे होत आहे. या गोष्टींना आपणच जबाबदार आहोत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा व अन्य नेत्यांनी उभारलेल्या संस्था बंद पडल्या, तर सहकार वाचविता येणार नाही. याबाबतीत कृतिशील कार्यक्रम राबविण्यात यावा, अन्यथा जन्मशताब्दी कार्यक्रमाची औपचारिकता पार पाडण्यात काहीच अर्थ नाही.
यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, वसंतदादांनी उभारलेली सहकार चळवळ टिकली, तरच ती दादांना खऱ्याअर्थाने आदरांजली ठरणार आहे. मात्र, सहकारी साखर कारखानदारीसह संपूर्ण चळवळच मोडीत काढण्याचा डाव सध्याच्या सरकारने मांडला आहे. यामध्ये कोणाचे नुकसान होणार आहे, याची कल्पना त्यांना नसावी. काँग्रेस सरकारने कधीही सहकार क्षेत्रात हस्तक्षेप केला नव्हता. आताच्या सरकारने नको तेवढा हस्तक्षेप केल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. दुष्काळग्रस्तांना, सामान्य लोकांना दिलासा देण्याचे कोणतेही निर्णय सरकारने घेतले नाहीत, ही एक शोकांतिका आहे. शेतीवरही आयकर लागण्याची चिन्हे या धोरणांमुळे दिसत आहेत. वसंतदादा असते, तर त्यांनी या गोष्टी खपवून घेतल्या नसत्या.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, वसंतदादा हे कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे जन्मशताब्दी महोत्सव शासनानेच साजरा करावयास हवा होता. मात्र, सरकार कोत्या मनाचे आहे. अशा कोत्या मनाने राज्य चालविता येत नसते. वसंतदादांनी कधीही सर्वसामान्य माणसाशी नाळ तोडली नाही. त्यामुळेच महान नेत्यांच्या पंक्तीत ते जाऊन बसले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, वसंतदादांचे सरकार आम्ही पाडून दुसऱ्या विचारसरणीचे सरकार आणले. तरीही १९८३ ला वसंतदादा जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी मला बोलावून मंत्रिपद दिले होते. वसंतदादांनी कधीही कोणाबद्दल कायमचा राग धरला नाही. सामान्य व्यवहारज्ञान असलेले ते लोभस नेतृत्व होते. तत्कालीन पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्यासमोर त्यांनी विनाअनुदानित शिक्षण संस्थांचा मुद्दा परखडपणे मांडला.
पंतप्रधानांसमोर ठामपणे बोलणारा असा नेता मी पुन्हा
पाहिला नाही. यावेळी शिवाजीराव पाटील-निलंगेकर आणि डॉ. डी. वाय. पाटील यांनीही त्यांच्या आठवणी मांडल्या.
वसंतदादांचे सहकारी यशवंत हाप्पे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उदय पवार यांनी आभार मानले. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
‘पढा हुआ नही,
कढा हुआ था’
आमच्या उत्तर प्रदेशमध्ये कमी शिकलेल्या हुशार माणसाला ‘पढा हुआ नही, पर कढा हुआ है’, अशी म्हण वापरली जाते.
वसंतदादांसाठी ती अत्यंत योग्य आहे. भाषांचे ज्ञान नसतानाही अन्य भाषिकांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जोडले, अशा शब्दांत दादांचा गौरव करीत जनार्दन द्विवेदी यांनी त्यांच्या आठवणी मांडल्या.
सर्वपक्षीय उपस्थिती
कार्यक्रमास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांच्यासह विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. भाजपचे आ. सुरेश खाडे, राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील, आ. सतेज पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, सत्यजित देशमुख, नसीम खान, रामहरी रुपनवर, दिलीपतात्या पाटील, विशाल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, स्वरदा केळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, शैलजाभाभी पाटील, आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
पैसा अडवा, विरोधकांची जिरवा
नारायण राणे म्हणाले की, राज्यातील सिंचन प्रकल्प दादांच्या नावाने ओळखले जातात. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, असा नारा त्यांनी दिला. आताच्या सरकारला अशा लोकहिताच्या गोष्टीत रस नाही. ‘पैसा अडवा, विरोधकांची जिरवा’, अशा भूमिकेतून ते काम करीत आहेत.