ऊस घालतो, पैसे कसे देणार सांगा..!
By Admin | Updated: October 1, 2015 00:43 IST2015-09-30T23:45:16+5:302015-10-01T00:43:24+5:30
वसंतदादा कारखाना सभा : सभासदांचा अध्यक्षांना सवाल, एफआरपीनुसार दर देण्याचे आश्वासन

ऊस घालतो, पैसे कसे देणार सांगा..!
सांगली : वसंतदादा साखर कारखान्यावर सभासदांचे प्रेम असल्यामुळेच ते ऊस घालत आहेत. मात्र त्यांची बिले वेळेवर मिळत नाहीत. याबाबत संचालकही दाद देत नसतील, तर आम्ही दाद कुणाकडे मागायची, असा संतप्त सवाल सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांना बुधवारी केला. यंदाही सभासद ऊस घालण्यास तयार आहेत, पण तुम्ही पैसे कसे देणार आणि त्याची तरतूद कशी केली आहे, ते सांगा, असा जाबही सभासदांनी यावेळी विचारला. येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत ऊसउत्पादक शेतकरी थकित बिलावरून आक्रमक झाले होते. गळीत हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आलेल्या उसाची बिले तात्काळ दिली जातात. परंतु, शेवटच्या टप्प्यात आलेल्या शेतकऱ्यांना पैसेच मिळत नाहीत. थकित बिलाबाबत सभासदांनी संचालकांकडे विचारले, तर ते दाद देत नाहीत, असा आरोप मीनाक्षी पाटील, प्रभाकर पाटील, अनिल पाटील आदी सभासदांनी केला. गुंडा माळी, अनंत झांबरे, अनिल शिंदे म्हणाले की, सभासद तुम्हाला ऊस घालण्यास तयार आहेत. मात्र या शेतकऱ्यांना तुम्ही बिले कशी देणार, याचा खुलासा करा.त्यावर विशाल पाटील म्हणाले की, यंदाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविणार आहोत. इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढविणार असल्यामुळे पैसे उपलब्ध होणार आहेत. बँकेकडून आर्थिक तरतूद केली असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देण्यात येईल. मिलिंद खाडिलकर, सर्जेराव पाटील यांनीही कारखाना प्रशासनाच्या उणिवांबद्दल संचालक मंडळाला जाब विचारला.यावेळी उपाध्यक्ष डी. के. पाटील, बाळगोंडा पाटील, कार्यकारी संचालक के. बी. घुटे-पाटील, संचालक आदिनाथ मगदूम, निवास पाटील, सचिन डांगे, संदेश आडमुठे, सुनील आवटी, दिलीप पवार, राजेश एडके, कामगार संघटनेचे नेते प्रदीप शिंदे, श्रीकांत देसाई, प्रकाश पाटील उपस्थित होते.
कारखाना खासगी संस्थेला द्या : बुटाले
वसंतदादा कारखाना आर्थिक अडचणीत असेल, तर तो चांगल्या संस्थेला चालवायला देण्याचा ठराव सभासद चंद्रशेखर बुटाले यांनी मांडला. त्यांनी गेल्यावर्षीही असाच ठराव मांडला होता. तुमच्याकडे पैसे आहेत, ते घाला आणि कारखाना पूर्ण क्षमतेने चालवा, तसेच संचालक आणि प्रशासकीय खर्च कमी करून कारखाना तोट्यातून बाहेर काढा, अशी मागणी बुटाले यांनी केली. यावेळी कारखाना खासगी संस्थेला चालविण्यास देण्यामध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.
इथेनॉल प्रकल्पाची
क्षमता वाढविणार
इथेनॉलला प्रतिलिटर ४८ रूपये दर मिळत आहे. शासनाची तशी हमी मिळाली आहे. वसंतदादा कारखान्याने इथेनॉल निर्मितीची क्षमता २५ हजार लिटरवरून ७५ हजार लिटर केली आहे. इथेनॉलची निर्मिती क्षमता वाढविल्यामुळे कारखान्यास चांगले उत्पन्न मिळेल. तोट्यातून बाहेर पडण्याबरोबरच दर चांगला मिळाल्यास यावर्षी ऊसउत्पादकांना चांगला दर देऊ, असेही विशाल पाटील म्हणाले.
‘वसंतदादा’ला टार्गेट
करण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातील अन्य सर्व कारखान्यांनी उसाला प्रतिटन १९०० रुपये दर देण्याचे जाहीर केले होते. परंतु, या धोरणाला आव्हान देत आम्ही २१०० रूपये देण्याचे जाहीर करून, हंगाम सुरू केला. आमची हीच भूमिका अनेक साखर कारखान्यांना खुपत असल्यामुळे, ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी ‘टार्गेट’ करण्याचे प्रयत्न करीत आहेत. वेळेवर कर्ज मिळण्यातही अशीच अडचण निर्माण झाली होती. तरीही शेतकऱ्यांच्या बळावरच आम्ही प्रस्थापितांच्या खेळीला चोख उत्तर देत आहोत, असा टोला विशाल पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला.