सांगलीत तीन ठिकाणी घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:29+5:302021-06-09T04:34:29+5:30
सांगली : शहरातील शामरावनगर, आकाशवाणी परिसरातील तीन घरे फोडून चोरट्यांनी डिव्हीआर मशीन, टीव्ही, प्रापंचिक साहित्यासह ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी ...

सांगलीत तीन ठिकाणी घर फोडले
सांगली : शहरातील शामरावनगर, आकाशवाणी परिसरातील तीन घरे फोडून चोरट्यांनी डिव्हीआर मशीन, टीव्ही, प्रापंचिक साहित्यासह ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी संजय देवाप्पा कुपाडे (रा. गणेश पार्क, कोल्हापूर रोड, सांगली), श्रीधर रावसाहेब कोळी (रा. आकाशवाणीच्या पाठीमागे, सांगली) आणि अफझलखान महंमदहनिफ पठाण (रा. शामरावनगर, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याने नेमका किती रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला, याची माहिती मिळू शकली नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी रात्रीच्यासुमारास हा चोरीचा प्रकार घडला. कोल्हापूर रोडवर अमित संजय कोरे यांचे कोरे सेल्स कार्पेारेशन नावाचे दुकान असून, चोरट्यांनी याठिकाणाहून डिव्हीआर मशीन व रोख ९२० रुपये लंपास केले. या दुकानातील कर्मचारी संजय कुपाडे यांनी फिर्याद दिली आहे.
आकाशवाणीच्या पाठीमागे राहण्यास असलेल्या श्रीधर कोळी यांच्या घरातील टीव्ही व घरातील इतर साहित्य चोरट्यांनी लांबविले.
तिसऱ्या घटनेत शामरावनगर रोडवरील भोसले प्लॉट येेथील जय गणेश कॉलनीत राहण्यास असलेल्या पठाण यांच्या घरातील तिजोरी व कपाट फोडून ऐवज लंपास केला. नेमका कितीचा ऐवज लंपास झाला, याची माहिती मिळू शकली नाही.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.