हात, भांडी धुतलेल्या पाण्यातून झाडे जगविली
By Admin | Updated: May 18, 2016 00:14 IST2016-05-17T23:57:37+5:302016-05-18T00:14:26+5:30
प्रतिदिन २०० लिटर पाण्याची बचत : मंगेशकर नगरमधील सांगलीकर कुटुंबीयांचा उपक्रम

हात, भांडी धुतलेल्या पाण्यातून झाडे जगविली
संतोष मिठारी --कोल्हापूर --हात धुतलेले, तसेच भांडी धुण्यासाठी वापरलेले अनेकांच्या घरातील पाणी थेट गटारीमध्ये जाते; पण याला मंगेशकर नगरातील सांगलीकर कुटुंबीय अपवाद ठरले आहेत. त्यांनी या पाण्याच्या पुनर्वापरातून आपल्या बंगल्याच्या परिसरातील विविध झाडे जगविली आहेत.या पाणी बचतीच्या प्रयत्नांबाबत गौरव सांगलीकर यांनी सांगितले की, मंगेशकरनगरमधील आमच्या बंगल्यात आई-वडिलांसह मी राहतो. बंगल्याच्या आवारात विविध फळे व फुलांची झाडे आम्ही लावली आहेत. सध्याच्या दुष्काळाच्या स्थितीत पाण्याची उपलब्धता कमी आहे. अशा स्थितीत झाडांना पाणी देण्यासाठी अन्य ठिकाणांहून पाणी उपलब्ध करणे अथवा खरेदी करण्याऐवजी आपल्याजवळ असलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने कसा वापर करता येईल, याचा आमचा विचार सुरू होता. वॉश बेसिन, भांडी धुतल्यानंतर उपलब्ध होणारे पाणी झाडांसाठी वापरण्याचे सुचले. अनेकदा हे पाणी वायाच जाते; पण आम्ही त्याचा पुनर्रवापर करण्याचे ठरविले. त्यानुसार वॉश बेसिनच्या नळाखाली मोठे भांडे ठेवले. त्यात हात आणि भांडी धुतल्यानंतरचे पाणी आम्ही वाचविले. हे पाणी बंगल्याच्या परिसरातील झाडांना दररोज दिले जाते. त्यासह वॉटर प्युरिफायरमधून बाहेर पडणारे अतिरिक्त स्वरूपातील पाणी थेट परसातील झाडांना दिले जात आहे. पाणी बचतीचा आमचा हा प्रयत्न छोटासा आहे. मात्र, त्यातून आम्हाला वेगळे समाधान मिळत आहे.
गरजेनुसार पाणी वापरावे
या प्रयत्नातून आम्ही दिवसाकाठी सुमारे २०० लिटर पाणी वाचवितो. झाडांना पुरेसे पाणी मिळाल्याची खात्री झाल्यानंतर हात, भांडी धुण्यातून उपलब्ध होणारे पाणी जमिनीत मुरविले जात असल्याचे गौरव सांगलीकर यांनी सांगितले. ते म्हणाले, आता आम्ही अंघोळ आणि हात-पाय धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याची बचत करणार आहोत. त्यासाठी बंगल्याच्या आवारात छोटीशी टाकी बांधून त्यामध्ये पाणी साठविणार आहे. साठविलेले हे पाणी ठिबक सिंचन पद्धतीने झाडांना देण्याची व्यवस्था करणार आहे. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे त्याची बचत करणे गरजेचे आहे. ते लक्षात घेऊन प्रत्येकाने गरजेनुसार पाण्याचा वापर करावा. छोट्या-छोट्या प्रयत्नांतून पाण्याची बचत करणे शक्य आहे. हे प्रयत्न कृतीत आणणे महत्त्वाचे आहे.