घरपट्टीच्या वसुलीवर पालिका चालत नाही
By Admin | Updated: December 19, 2014 00:21 IST2014-12-18T22:19:30+5:302014-12-19T00:21:47+5:30
मदन पाटील : शहराच्या विकासासाठी एलबीटी वसुली आवश्यकच

घरपट्टीच्या वसुलीवर पालिका चालत नाही
सांगली : आम्ही कधीही व्यापाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. परंतु केवळ घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिले वसूल करून महापालिकेचा कारभार चालत नाही. विकासकामे करायची असतील, तर त्याला निधी गरजेचा असून यासाठी थकित वसुली होणेही तितकेच आवश्यक असल्याचे मत माजी आ. मदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, एलबीटीबाबत कारवाई थांबविण्यात आलेली नाही. आम्ही कधीही व्यापाऱ्यांच्या विरोधात नव्हतो. परंतु सध्या एलबीटी प्रश्नाचे राजकारण केले जात आहे. वसुली थांबविण्याबाबत आयुक्तांना कोणताही लेखी आदेश आलेला नाही. आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी आलेला आहे. दूरध्वनीवर झालेली चर्चा म्हणजे आदेश नाही. शहराच्या विकासासाठी महापालिका सुस्थितीत हवी असेल, तर पालिकेची ‘आर्थिक’ स्थिती भक्कम असली पाहिजे. यासाठी एलबीटीची थकित वसुली होणे आवश्यक आहे. एलबीटीप्रश्नी आता व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता नाही. शेरीनाल्याची योजना पूर्ण झाली असून आमच्यादृष्टीने हा प्रश्न संपला असल्याचेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)