सांगलीत भक्तिभावाने घरगुती गणपतींचे विसर्जन
By Admin | Updated: September 2, 2014 23:53 IST2014-09-02T23:53:36+5:302014-09-02T23:53:36+5:30
७५ मंडळांचाही समावेश : सांगलीच्या सरकारी घाटावर गर्दी; रात्री उशिरापर्यंत मिरवणुका

सांगलीत भक्तिभावाने घरगुती गणपतींचे विसर्जन
सांगली : समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या घरगुती गणपतींचे आज भक्तिमय वातावरणात पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. शहरातील ५० हून अधिक मंडळांनीही ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण करीत ‘श्रीं’चे वाजत-गाजत विसर्जन केले. गणपती विसर्जनासाठी सरकारी घाटावर मोठी गर्दी झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात नागरिकांनी गणरायाला निरोप दिला.
गेले पाच दिवस सांगली शहर गणेशमय झाले होते. घरा-घरात ‘श्रीं’च्या आरतीचा आवाज घुमत होता. अबाल-वृद्ध गणरायाच्या भक्तीत मग्न झाले होते. पाचव्यादिवशी अनेकांनी घरगुती गणपतीचे विसर्जन केले. ‘मोरया’चा गजर करीत नागरिक गणपती विसर्जनासाठी सरकारी घाटाकडे जात होते. सायंकाळनंतर श्रींच्या विसर्जनासाठी घाटावर गर्दी झाली होती. पुढच्या वर्षी लवकर या, असे साकडे घालत श्रींना निरोप देण्यात आला. यावेळी सरकारी घाटावर महापालिकेच्यावतीने निर्माल्य संकलनासाठी कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. डॉल्फिन नेचर ग्रुपच्यावतीनेही कार्यकर्ते हातात फलक घेऊन निर्माल्य नदीत टाकू नका, असे आवाहन करीत होते.
घरगुती गणपतीसोबतच सार्वजनिक मंडळांच्या श्रींचेही विसर्जन झाले. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २५ व विश्रामबाग हद्दीतील २८ मंडळांनी आज विसर्जन केले. सायंकाळी सात वाजेपर्यंत आठ ते दहा मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. मंडळांचे कार्यकर्ते गुलालात न्हाऊन निघाले होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशा, डॉल्बीचा दणदणाट, बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साही वातावरणात मंडळांनी ‘श्रीं’ना निरोप दिला. (प्रतिनिधी)