तासगावात आर. आर. आबा-संजयकाका गटाचे सूर जुळले!
By Admin | Updated: April 30, 2015 00:23 IST2015-04-29T23:39:32+5:302015-04-30T00:23:46+5:30
जिल्हा बँक निवडणूक : १७९ मतदार; एकतर्फी लढतीची शक्यता; उमेदवारांकडून वैयक्तिक भेटीगाठीवर जोर

तासगावात आर. आर. आबा-संजयकाका गटाचे सूर जुळले!
तासगाव : तासगाव तालुक्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील गटाने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सूर जुळवले आहेत. शेतकरी सहकारी पॅनेलच्या माध्यमातून तालुक्यातील चार उमेदवार, तर रयत सहकारी पॅनेलमधून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तालुक्यात १७९ मतदार आहेत. सर्वच उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठीवर जोर देत प्रचाराला सुरुवात केली आहे.
खासदार संजय पाटील राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर आबा आणि काका गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोराचा हल्लाबोल केला होता. दोन्ही गटांतील संघर्ष उफाळून आला होता. मात्र राजकारणातील बदललेल्या समीकरणांमुळे पुन्हा एकदा आबा आणि काका गटाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित सूर जुळवले आहेत.
आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेलमधून राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहेत. आर. आर. पाटील यांच्या पश्चातदेखील तालुक्याला बँकेत चांगली संधी मिळाली आहे. आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांना कृषी, पणन, प्रक्रिया गटातून, मांजर्डेच्या कमलताई पाटील यांना महिला राखीवमधून, मणेराजुरीच्या सतीश पवार यांना सोसायटी गटातून संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून स्वत: खासदार संजय पाटील पतसंस्था, बँका गटातून निवडणूक लढवत आहेत. आमदार पतंगराव कदम यांच्या रयत सहकार परिवर्तन पॅनेलमधून सोसायटी गटातून शिरगावचे प्रताप पाटील रिंगणात आहेत.
आबा आणि काका गटाचे सूर जुळल्याने याच पॅनेलचे पारडे जड राहणार आहे. तरीही प्रताप पाटील यांची उमेदवारी आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांची नाराजी यामुळे काही उलथापालथ होणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. सर्वच उमेदवारांनी गाफील न राहता, मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करण्यावर भर दिला असून, त्यासाठी कार्यकर्तेही जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील मतदार...
सोसायटी गट - ७५
कृषी, पणन, प्रक्रिया गट - ११
पतसंस्था, बँका गट - ४४
इतर संस्था गट - २८
एकूण - १७९