तासगावात ‘कारभाऱ्यांचा’ इंटरेस्ट ठेकेदारीत

By Admin | Updated: May 25, 2015 00:30 IST2015-05-25T00:10:43+5:302015-05-25T00:30:42+5:30

विकासावर चर्चाच नाही : शहरवासीयांचा अपेक्षाभंग, कामांचे मूल्यांकन करणार कोण?==खेळखंडोबा तासगावचा-५

Hours Contracting 'Contractual Interest Contract' | तासगावात ‘कारभाऱ्यांचा’ इंटरेस्ट ठेकेदारीत

तासगावात ‘कारभाऱ्यांचा’ इंटरेस्ट ठेकेदारीत

दत्ता पाटील - तासगाव -तासगाव शहराचा सर्वांगीण विकास साधला जावा, यासाठी तासगावकरांनी मोठ्या अपेक्षेने नगरसेवकांना निवडून दिले, मात्र गेल्या साडेतीन वर्षातील चित्र पाहिल्यास तासगावकरांचा अपेक्षाभंगच झाल्याचे दिसून येते. ठेकेदारी आणि सत्तेसाठी नगरपालिकेतील कारभाऱ्यांचा संघर्ष पहायला मिळाला. परंतु विकासकामांवर चर्चा होताना दिसून आली नाही. नेत्यांची मर्जी सांभाळून उमेदवारी आणि पद मिळवणाऱ्या या कारभाऱ्यांचे मूल्यांकन होणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील यांचा गट राष्ट्रवादीच्या माध्यमातून एकत्रित होता. यावेळी काँग्रेसला एकच जागा मिळाली. उर्वरित सर्व जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. सत्तेत विराजमान झाल्यानंतर मात्र पदाच्या लालसेपोटी इथल्या नगरसेवकांनी सत्तेची संगीतखुर्ची केली. प्रत्येकालाच पद हवे होते; मात्र दुसरीकडे विकासाचा अट्टाहास दिसून आला नाही.
अडीच वर्षानंतर राजकीय समीकरणे बदलली. सत्तेत असणारा खासदार गट विरोधात गेला. एकमेव काँग्रेसच्या नगरसेवकाला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत राहिले, तर खासदार संजय पाटील यांच्या गटाकडे समित्यांची पदे पदरात पडली. परंतु त्यानंतरही विकासाचे सकारात्मक चित्र पहायला मिळाले नाही. साडेतीन वर्षात नगरपालिकेत झालेल्या सभांतून विकासासाठी हल्लाबोल करणारे विरोधक पहायला मिळाले नाहीत. विकासाची तळमळ असलेले सत्ताधारीही पहायला मिळाले
नाहीत.
परंतु एखाद्या कामाचा ठेका मर्जीतील ठेकेदारालाच मिळावा, यासाठी आकंडतांडव करणारे नगरसेवक पहायला मिळाले. विकासकामांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक झाल्याचे पहायला मिळाले नाही. मात्र ठेकेदारीच्या कामासाठी नगरसेवकांच्या बैठका अनेकदा होत असतात. त्यामुळे या नगरसेवकांना निवडून कशासाठी दिले? असाच प्रश्न तासगावकरांना पडलेला आहे.
नेत्यांनी दिलेल्या उमेदवारावर विश्वास दाखवून जनतेने नगरसेवकांना निवडून आणले. नगरसेवक होण्यासाठी विकास लागत नाही, तर नेत्यांची मर्जी मिळवावी लागते. असेच इथले चित्र आहे. मात्र या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन नेत्यांनी आतापर्यंत केलेले नाही. त्यामुळे निधीसाठी शासन स्तरावरून पाठपुरावा होत असला तरी, विकासासाठी नगरपालिकेच्या स्तरावर पाठपुरावा होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहराच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत असून, शहराला बकाल स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे. (समाप्त)


आमदार, खासदारांकडून अपेक्षा
आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपले वजन वापरून नगरपालिकेसाठी अनेक योजना मंजूर करून आणल्या. निवडणुकीच्या काळात तासगावकरांना दिलेल्या आश्वासनांची पूतर्ता करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी कोट्यवधींचा निधीही मंजूर करून आणला. परंतु आता सत्ता बदलल्यामुळे नगरपालिकेसाठी खासदार संजय पाटील यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. खासदार संजय पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन करून विकासाचा वेग वाढवला जाईल, अशी जनतेला अपेक्षा आहे.



सभा त्वरित गुंडाळू नये...
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा अवघ्या दहा ते वीस मिनिटात गुंडाळण्याची प्रथा गेल्या साडेतीन वर्षांपासून कायम आहे. वास्तविक या सभांतून विकास कामांवर सविस्तर चर्चा, शहरातील समस्या यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी, उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने धोरण ठरविण्यासाठी निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा गुंडाळण्याची प्रथा खंडित व्हावी, अशी अपेक्षा तासगावकरांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Hours Contracting 'Contractual Interest Contract'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.