‘जनआरोग्य’च्या अंमलबजावणीत रुग्णालयांचाच खोडा; लाभार्थींना अडचणींचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST2021-05-17T04:24:51+5:302021-05-17T04:24:51+5:30
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग वाढतच चालला असताना, त्यावरील उपचाराचे व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...

‘जनआरोग्य’च्या अंमलबजावणीत रुग्णालयांचाच खोडा; लाभार्थींना अडचणींचा सामना
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग वाढतच चालला असताना, त्यावरील उपचाराचे व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना फलदायी ठरत असली तरी अनेक रुग्णालयांकडूनच त्याच्या अंमलबजावणीत अडचणी आणल्या जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील १० खासगी व ५ शासकीय रुग्णालयात योजना लागू असली तरी त्याचा लाभ देताना हात आखडता घेतला जात आहे. तरीही दीड महिन्यात १९०० जणांनी योजनेचा लाभ घेतला आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना लागू करण्यात आली. प्रशासनातर्फे योग्य नियोजन करण्यात येत असले तरी रुग्णालयांकडून त्याच्या अंमलबजावणीत असमर्थता दर्शवली जाते. त्यामुळे योजना लागू असलेल्या रुग्णालयांतही लाभार्थींना लाभ मिळताना दिसत नाही. गेल्यावर्षी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर सुधारणा झाली होती. मात्र, सध्या तांत्रिक कारण सांगून अथवा योजनेस मंजूर केलेली बेड शिल्लक नसल्याचे कारण सांगून लाभ दिला जात नसल्याचे चित्र आहे.
चौकट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना समाजातील सर्व दुर्बल घटकांना चांगले उपचार मिळणे अपेक्षित आहे. प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करूनही त्याच्या अंमलबजावणीत रुग्णालयांकडूनच खोडा घातला जात आहे.
अशी करा नोंदणी
कोरोनाबाधितांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात ‘आरोग्य मित्र’ संकल्पना राबविली जात आहे. रुग्णाला अगोदर उपचार सुरू करण्यास आरोग्य मित्र प्राधान्य देतात. रुग्णालयातच असलेल्या या सुविधेचा लाभार्थींना उपयोग होत आहे.
चौकट
...तर करा तक्रार
* महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण असल्यास त्याबाबत थेट तक्रार करता येते.
*प्रशासनाकडून यासाठी टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे. यावर रुग्णालयाकडून लाभ मिळत नसल्याची तक्रार करता येऊ शकते.
* योजनेचे जिल्हा समन्वयकांशी थेट संपर्क साधूनही योजनेतील लाभ मिळण्याविषयी अडचणी सांगता येऊ शकतात. शासकीय रुग्णालयात त्यांचा कक्ष आहे.
चाैकट
उपचारासाठी पैसे उभे करताना अडचणींचा डोंगर
*आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांच्या सोयीसाठी योजना असली तरी प्रत्यक्षात लाभ मिळवताना अनेक अडचणी येत आहेत.
* कोरोनाबाधिताला वेळेत उपचार आवश्यक असल्याने अनेकदा मिळेल त्या बेडवर उपचार सुरू केले जातात. * बहुतांशवेळा कोरोनाबाधिताचे संपूर्ण कुटुंब विलगीकरणात असल्याने कागदपत्रे मिळण्यासही अडचणी येतात यावर योजनेच्या प्रशासनाने कागदपत्रे सॉफ्ट कॉपी स्वीकारून त्यांच्यावर उपचार सुरू केली जात आहेत.