ऑक्सिजन पातळी ९५ वर स्थिर होईपर्यंत रुग्णालयातच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST2021-05-28T04:19:57+5:302021-05-28T04:19:57+5:30

सांगली : दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधिताची ऑक्सिजन पातळी अचानक खालावत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पातळी किमान ९५ वर स्थिरावेपर्यंत ...

In-hospital treatment until oxygen level stabilizes at 95 | ऑक्सिजन पातळी ९५ वर स्थिर होईपर्यंत रुग्णालयातच उपचार

ऑक्सिजन पातळी ९५ वर स्थिर होईपर्यंत रुग्णालयातच उपचार

सांगली : दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधिताची ऑक्सिजन पातळी अचानक खालावत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पातळी किमान ९५ वर स्थिरावेपर्यंत रुग्णालयातच उपचार सुरू ठेवण्यास डॉक्टर प्राधान्य देत आहेत. याद्वारे कोरोनापश्चात मृत्यू टाळण्याचा प्रयत्न आहे.

दुसऱ्या लाटेत रुग्णाच्या प्रकृतीतील चढ-उतार धोकादायक ठरत असल्याचे डॉक्टरांचे अनुभव आहेत. घरातून निघताना ९० पेक्षा जास्त असणारी ऑक्सिजन पातळी रुग्णालयात जाईपर्यंत ७०-८० पर्यंत घसरत असल्याचा चिंताजनक अनुभव आहे. १४ दिवसांच्या उपचारानंतर रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे गृहित धरले जाते. पण घरी गेलेल्या अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अचानक खालावल्याचा, प्रसंगी रुग्ण दगावल्याचा अनुभव येत आहे. डिस्चार्जच्या शेवटच्या टप्प्यात कृत्रिम ऑक्सिजन कमी केला जातो. काहीवेळा पूर्ण थांबवलाही जातो. पातळी ९०-९१ पर्यंत आली तरी प्रकृती धोक्याबाहेर मानली जाते. मिरज कोविड रुग्णालयातील रुग्णांचा ऑक्सिजन ९४-९५ वर स्थिरावण्याची काळजी घेतली जात आहे. यामुळे प्रकृतीविषयी धोका अजिबात राहत नाही. कोरोनापश्चात मृत्यूचा धोकाही टळतो.

चौकट

खासगी रुग्णालयांतून १० दिवसातच डिस्चार्ज

खासगी रुग्णालयांतून सर्रास रुग्णांना १०-१२ दिवसातच डिस्चार्ज दिला जातो. ऑक्सिजन ९० वर जाताच डिस्चार्ज मिळतो. घरात कॉन्सन्ट्रेटर किंवा सिलिंडरद्वारे ऑक्सिजन घेण्याची सूचना केली जाते. पण यामध्ये ऑक्सिजन अचानक खालावून रुग्ण दगावण्याचा धोका पुढे येत आहे.

चौकट

अशा होतात चाचण्या...

ऑक्सिजन ९३-९४ पर्यंत राहिल्यास रुग्ण नैसर्गिकरित्या ऑक्सिजन घेण्यास सक्षम झाल्याचे मानले जाते. दुसऱ्या टप्प्यात सहा मिनिटे चालण्याची चाचणी घेतली जाते. चालल्यानंतर किमान ९०-९१ पर्यंत पातळी राहिली तरी चालते. मिनिटाला एक लिटर ऑक्सिजनचा कृत्रिम पुरवठा घेणारा रुग्णदेखील धोक्याच्या पातळीबाहेर मानला जातो.

कोट

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अचानक खालावण्याचा प्रकार दिसत आहे. त्यामुळे रुग्णाचा ऑक्सिजन स्थिरावेपर्यंत खबरदारी घ्यावी लागते. कृत्रिम पुरवठा टप्प्या-टप्प्याने कमी करत राहतो. चालण्याची चाचणीही घेतली जाते. पातळी स्थिरावल्यानंतरच डिस्चार्जचा निर्णय होतो. किमान ९४-९५ पर्यंत पातळी येण्याची काळजी घ्यावी लागते.

- डॉ. रवींद्रकुमार माने, विवेकानंद रुग्णालय, बामणोली

Web Title: In-hospital treatment until oxygen level stabilizes at 95