रुग्णालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था
By Admin | Updated: December 2, 2014 00:18 IST2014-12-01T23:22:36+5:302014-12-02T00:18:28+5:30
कोकरुडमधील प्रकार : अधिकारी, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

रुग्णालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था
संजय घोडे-पाटील- कोकरूड (ता. शिराळा) येथील ग्रामीण रुग्णालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अक्षरश: वाताहत झाली आहे. रुग्णालयातील अधिकारी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असून, याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी रुग्णांतून होत आहे. वरिष्ठांचा कर्मचाऱ्यांवर वचक न राहिल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियानाला ठेंगा दाखविल्याचेही स्पष्ट होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयांना स्वच्छ व सुंदर भारत अभियान राबविण्यासाठी पुढे यावे, अशी साद घातली. आपले घर, आॅफिस परिसर स्वच्छ ठेवावा, अशी विनंतीही केली. त्याला बहुतांश ठिकाणी चांगला प्रतिसाद लाभला. मात्र शिराळा तालुक्यातील कोकरुड ग्रामीण रुग्णालयाने त्याला अक्षरश: वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे जागोजागी दिसून येत आहे. रुग्णालय आवारात अनेक ठिकाणी कचरा पडून असल्याचे दिसत आहे. तसेच भिंती पानाच्या रंगाने लाल झाल्याचे दिसत आहे.
शिराळा या तालुक्याच्या ठिकाणानंतर पश्चिम भागातील महत्त्वाचे ठिकाण असणाऱ्या कोकरुड येथील रुग्णालयात ५0 ते ६0 गावचे गरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. ग्रामीण रुग्णालय असूनदेखील येथील अधीक्षक पद गेले कित्येक महिने रिकामे आहे. याठिकाणी निवासी डॉक्टरची जागा असतानाही कोणीही डॉक्टर रात्री वास्तव्यास रहात नाहीत. रात्री-अपरात्री अत्यवस्थ रुग्ण आला तरी, त्याची दखल घेतली जात नाही. त्याला इतर खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखवला जातो. काही वेळेला येथील कंपाऊंडरच जुजबी उपचार करतात. वरिष्ठ अधिकारी याठिकाणी रहात नसल्याने त्यांचा येथील कर्मचाऱ्यांवरही वचक राहिलेला नाही.
रुग्णालय परिसरात सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त वातावरण आहे. येथील चार स्वच्छतागृहांपैकी तीन स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत. तरीही नाईलाजास्तव याचा वापर रुग्णांना करावा लागत आहे. महिला रुग्णांची तर कुचंबणा होते. याठिकाणी येणारे रुग्ण गरीब असल्याने ते याची कोठेही तक्रार करत नाहीत. याचाच गैरफायदा येथील कर्मचारी घेत आहेत. तरी रुग्णालयातील स्वच्छतागृहाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रुग्णालयाला संरक्षक भिंत नसल्याने शेजारीच असणाऱ्या बसस्थानकावरील प्रवासी व वडापचे चालक रुग्णालयाच्या स्वच्छतागृहाचा वापर करीत असतात.
महिलांची गैरसोय
रुग्णालय परिसरात सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त वातावरण आहे. येथील चार स्वच्छतागृहांपैकी तीन स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत. तरीही नाईलाजास्तव याचा वापर रुग्णांना करावा लागत आहे. महिला रुग्णांची तर कुचंबणा होते. याठिकाणी येणारे रुग्ण गरीब असल्याने ते या प्रकाराची कोठेही तक्रार करत नाहीत. याचाच गैरफायदा येथील कर्मचारी घेत आहेत.