पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा
By Admin | Updated: August 5, 2015 00:01 IST2015-08-05T00:01:28+5:302015-08-05T00:01:28+5:30
कुलगुरूंकडून सत्कार : सोन्याच्या अंगठ्या केल्या परत

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक तोळा सोन्याच्या अंगठ्या परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागात एम.फिल. करणाऱ्या मयूरेश पाटील या विद्यार्थ्याने शनिवारी आपल्या अर्ध्या-अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगठ्या खिशात ठेवल्या होत्या. दिवसभरात कामाच्या गडबडीत त्याच्या खिशातून दोन्ही अंगठ्या कुठे तरी पडल्या. त्या अंगठ्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागातील योगेश घोडके, सुशांत उपाध्ये, रोहित ताशिलदार, रत्नदीप घोलप आणि रमेश पाटील या विद्यार्थ्यांना सापडल्या. दरम्यान, मयूरेश आणि त्याच्या मित्रांनी अंगठ्यांचा शोध सुरू केला होता. अंगठ्या मिळत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरातील अधिविभाग आणि ग्रंथालयात त्यासंबंधी नोटीस लावली. ती या विद्यार्थ्यांच्या वाचनात आली. त्यांनी मयूरेशशी संपर्क साधून अंगठ्या सापडल्याचा दिलासा दिला आणि दक्षता म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या दालनात सुरक्षा विभागाचे उपकुलसचिव संजय कुबल यांनी त्या सुपूर्द केल्या. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीही या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे यांच्यासह वृ
त्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)