जिल्ह्यातील होमगार्ड चार महिने पगारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:32+5:302021-06-09T04:34:32+5:30
सांगली : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणारे जिल्ह्यातील ९०० होमगार्ड गेली चार महिने पगारापासून वंचित आहेत. सध्या होमागार्डचा ...

जिल्ह्यातील होमगार्ड चार महिने पगारापासून वंचित
सांगली : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणारे जिल्ह्यातील ९०० होमगार्ड गेली चार महिने पगारापासून वंचित आहेत. सध्या होमागार्डचा संसार उधारी, हातउसन्या मदतीवर सुरू असून आर्थिक पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
सण, उत्सव, निवडणुकीच्या काळात पोलिसांच्या बरोबरीने होमगार्ड कर्तव्य बजावित असतात. गुन्ह्याच्या तपासाचा भाग वगळता पोलिसांची सर्वच कर्तव्ये त्यांना पार पाडावी लागतात. त्यामुळे होमगार्डला नियमित पगार मिळणे अपेक्षित आहे. यातच होमगार्ड म्हणून काम करणाऱ्या अनेक तरुणांची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. विशेषत: दुष्काळी जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातील तरुणांचा होमगार्ड म्हणून नोकरी करण्याकडे अधिक ओढा आहे. नोकरी मिळत नसल्याने तुटपुंज्या पगारावर ते तरुण होमगार्डची नोकरी करीत असतात. काही जणांचे तर आता निवृत्तीचे वय झाले आहे. तरीही ते निष्ठेने हे काम करतात.
कोरोनाच्या काळात होमगार्डची पोलीस खात्याला मोलाची मदत झाली आहे. लाॅकडाऊनच्या काळात चौकाचौकातील बंदोबस्तासाठी होमगार्डची नियुक्ती झाली होती. तसेच कोविड सेंटरवरही बंदोबस्तांसाठी होमगार्ड होते. जिवाची पर्वा न करता काम करीत असताना त्यांना चार महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. डिसेंबरचा पगार त्यांना मिळाला आहे. जानेवारी महिन्यात हे होमगार्ड कर्तव्यावर होते. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने फेब्रुवारी महिन्यात त्यांचे काम बंद झाले. मार्चमध्ये संसर्ग वाढल्यानंतर पुन्हा होमगार्डला काम मिळाले. एप्रिल, मे आणि आता जूनमध्येही ते कर्तव्यावर आहेत; पण त्यांचा जानेवारीपासूनचा पगार थकीत आहे. त्यामुळे संसाराचा गाडा हाकण्यात त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
चौकट
कोट
होमगार्डच्या वेतनाचा प्रस्ताव दरमहा शासनाकडे पाठविला जातो. फंड शिल्लक नसल्याने पगार थकले आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत त्यांना दोन महिन्याचा पगार मिळाले. उर्वरित पगारासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- मधुकर शिंदे, प्रशिक्षण अधिकारी, होमगार्ड
चौकट
जिल्ह्यातील होमगार्डची संख्या : १२००
सध्या कामावर असलेले : ९००
दररोजचे मानधन : ६७० रुपये