बनावट नोटाप्रकरणातील संशयितांच्या घरी छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST2021-01-13T05:08:36+5:302021-01-13T05:08:36+5:30
सांगली : दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर आता ...

बनावट नोटाप्रकरणातील संशयितांच्या घरी छापे
सांगली : दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर आता त्यांच्या घरांची झडती घेत नोटांचा कुठे कुठे वापर करण्यात आला. याची माहिती पोलीस घेत आहेत. या टोळीतील विजय बाळासाहेब कोळी (वय ३३, रा. अमर चौक, रेठरेधरण, सध्या रा. दत्तनगर, कुपवाड), शरद बापू हेगडे (३४, रा. राम-रहीम कॉलनी, संजयनगर) या दोघांच्या घराची पोलीस पथकाने रविवारी झडती घेतली. तर नोटा बनविणारा मुख्य संशयित तेजस ऊर्फ भावड्या सूर्यकांत गोरे (वय २३, मोरोची, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्या घराचीही झडती घेतली जाणार आहे. दरम्यान, या संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते. कुपवाडमध्ये बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असतानाच दोघांना ताब्यात घेण्यात आले होते तर नोटा तयार करणाऱ्यास माळशिरस येथून ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांनी बनावट नोटा तयार करून त्या पंढरपूरच्या वारीवेळी व इतरवेळी चलनात आणल्या होत्या. बनावट नोटांद्वारे सोन्याचीही खरेदी केली होती. विशेष म्हणजे, हे सोनेही बनावट होते.
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांनी बनावट नोटा नेमक्या कुठे कुठे वापरात आणल्या याची माहिती घेण्यात येत आहे.
चौकट
बाजारातील कागदापासून नोटा
व्यवसायाने फोटोग्राफर असलेला तेजस गोरे हा मोरोची येथील आपल्या घरातच नोटा तयार करत होता. यासाठी तो विशिष्ट कागद न वापरता बाजारात मिळणाऱ्या ए फोर कागदापासूनच नोटा बनवत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.